‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर लाखो प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केलं आहे. थकून भागून आल्यानंतर प्रेक्षक स्वतःचं मनोरंजन हवं यासाठी ‘हास्यजत्रा’ आवर्जून पाहतात. संपूर्ण महाराष्ट्रातचं नव्हे तर परदेशातही या कार्यक्रमाचे चाहते आहेत. आजवर या कार्यक्रमातील कलाकारांनी, त्यांच्या विनोदी स्कीटने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज या कार्यक्रमाचा चाहतावर्ग एका कलाकाराला अजूनही मिस करताना दिसतोय. इतकंच नव्हे तर ‘हास्यजत्रे’ची टीमही या कलाकाराला विसरू शकली नाही. हा अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. (Onkar Bhojane Incident)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ओंकारने एक्झिट घेतली तेव्हापासून हास्यजत्रेचे प्रेक्षक व चाहते ओंकार ‘हास्यजत्रे’त केव्हा परतणार याकडे डोळे लावून बसले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगने आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..’ या ओंकारच्या संवादाने समस्त प्रेक्षकांना वेड लावले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ओंकारने एक्झिट जरी घेतली असली तरी आजही सारा महाराष्ट्र ओंकारच्या स्किट्सला, ओंकारला मिस करताना दिसतोय.
करोनाकाळात सर्वकाही ठप्प झालेलं होतं. संबंध सिनेसृष्टीही ठप्प झाली होती. यादरम्यानचा ओंकार भोजनेचा एक किस्सा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे लेखक, दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा, मस्ती आणि पॉडकास्ट’ या युट्युब चॅनेलला मुलाखत देताना सांगितला. यावेळी बोलताना सचिन मोटे म्हणाले, “ज्यावेळी करोनाकाळात आम्ही प्रत्येक कलाकारांचं मानधन वाढवलं होतं त्यावेळी ओंकार भोजने स्वतः म्हणाला होता की, सर, शक्य नसेल तर नका वाढवू माझं मानधन, एवढी ओढाताण सुरु आहे आणि त्यात तुम्ही पगार देताय ही खूप मोठी गोष्ट आहे.”
सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षक वर्गाचा लाडका अभिनेता ओंकारने ‘हास्यजत्रे’तून एक्झिट घेत सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे पावलं टाकली आहेत. एकांकिका क्षेत्रापासून ओंकारने अभिनयाची सुरुवात केली. मध्यंतरी त्याने छोट्या पडद्यावर आपला वावर वाढवला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीकडे पावलं टाकत ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट केला. तसेच त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या ओंकार ‘करून गेलो गाव’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.