‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर हे वाऱ्यासारखे सोशल मीडियावर तुफान गाजले होते. आता ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. अनेक वैशिष्ट्यपूर्ण असा हा चित्रपट रिलीज आधीच प्रचंड चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले ‘बहरला हा मधुमास…’ हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे. (maharashtra shahir)
एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी आणि कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे.
मराठी भाषेतले हे दोन परस्पर विरोधी रंग या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे दिवशी सादर झालेले हे प्रेमगीत १९४२ सालच्या रंगात रंगलेले पाहायला मिळतेय तर २०२३ सालच्या तरुणाईला हे प्रेमगीत रंगात रंगवून टाकेल यांत शंका नाही. (maharashtra shahir)

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीला शाहीर साबळे यांच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरेल तर सना शिंदे शाहीर साबळेंच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सना शिंदे ही दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी असून ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून ती सिनेविश्वात पाऊल टाकण्यास सज्ज झाली आहे. यांच्यासह चित्रपटात अतुल काळे, अमित डोलावत हे कलाकारही झळकणार आहेत. ‘बहरला हा मधुमास…’ या गाण्यात सनाचा एक आगळावेगळा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.
====
हे ही वाचा – रंगभूमीवर लागू होणार ‘नियम व अटी’! संकर्षण कऱ्हाडे लिखित नवीन नाटकाची घोषणा
====
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील हे गाणे गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले आहे. तर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले आणि व्हर्सटाईल गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेया घोषालने हे गाणे सुरबद्ध केले आहे. तर संपूर्ण चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचीची प्रस्तुती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. चित्रपटाचे निर्माते म्हणून संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे. (maharashtra shahir)
“हे एक प्रेमगीत असून शाहीर साबळे आणि त्यांच्या पत्नी भानुमती यांच्या प्रेमाची कथा त्यातून अलगद उलगडत जाते. शाहीर म्हणजे माझे आजोबा हा अस्सल सातारी रांगडा गडी तर माझी आजी ही शहरी पार्श्वभूमी असलेली एक सुविध्य तरुणी. कलेच्या एका धाग्याने दोघेही एकत्र आलेले आणि जणू एकमेकांसाठीच जन्मलेले. ‘बहरला हा मधुमास…’मधून त्यांच्या प्रेमकथेचा जणू एक आगळा आविष्कारच समोर येतो. गीतकार आणि संगीतकारांनी या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे,” असे चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी म्हटले आहे. (maharashtra shahir)
येत्या २८ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.