सिनेसृष्टीला हादरा बसवेल अशी एक दुर्घटना समोर आली. यामुळे संबंध सिनेविश्वाला मोठा धक्का बसला. कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असलेला केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झालं आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरचा आत्माच या घटनेने होरपळला गेला. करवीरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं केशवराव भोसले नाट्यगृह व ऐतिहासिक खासबाग मैदानाचे व्यासपीठ शाॅर्ट सर्किटने लागलेल्या आगीत खाक झाले असल्याचे समोर आले. (Sonali Patil on Keshavrao Natyagruha Fire)
नाट्यगृहाला आग लागल्यानंतर कलाप्रेमी कोल्हापूरकरांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. इतकंच नव्हे तर सिनेसृष्टीतूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी अनेकांनी मदतीची तयारी दर्शविली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे. त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जात आहे. आग लागताना कोणताही कार्यक्रम सुरु नव्हता. मात्र, रात्री पाऊने दहाच्या आसपास या आगीला सुरुवात झाली आहे.
सदर घटना पाहून अभिनेत्री सोनाली पाटीलला दुःख अनावर झाले. घटनास्थळी जात सोनालीने एक व्हिडीओ शेअर केला. यावेळी तिने घडलेल्या दुर्घटनेबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना सोनालीला अश्रूही अनावर झाले. सोनाली ही मूळची कोकणातील आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं की, “मला माझी ओळख करुन द्यायची गरज नाही. आणि ही ती वेळ पण नाही. मी आजच कोल्हापूरमध्ये आली आहे. आम्हा कोल्हापूरकर व रंगभूमीसाठी आजचा हा सगळ्यात वाईट दिवस आहे”.
पुढे भरल्या डोळ्यांनी बोलत सोनाली म्हणाली, “केशवराव भोसले नाट्यगृह पूर्ण जळून खाक झालं आहे. बघायचीही इच्छा होत नाही आहे. आमच्या सगळ्यांची नाळ जोडली गेली होती अशी ही रंगभूमी होती. या रंगमंचाने आम्हाला उभं केलं. आम्ही इथे खूप नाटक केली. आमचं हे घर होतं. आमचं कोल्हापूरचं हे वैभव जळून खाक झालं आहे. आणि ही गोष्ट मला सगळ्यांना सांगायची होती. आता ते नाट्यगृह पुन्हा उभं राहिल्यानंतर ते कसं असेल हे मला माहित नाही”.