देशातील सर्वात प्रतिष्ठित असा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच गोवा येथे पार पडणार आहे. या महोत्सवात अनेक विदेशी भाषांसह भारतीय भाषांचे चित्रपट दाखवले जातात. दरम्यान, यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘फिल्म बाजार’ विभागासाठी महाराष्ट्र शासनाने अभिनेत्री मधुरा वेलणकरचा ‘बटरफ्लाय’, ‘ग्लोबल आडगाव’ आणि ‘गिरकी’ या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हे तीन मराठी चित्रपट दाखवले जाणार आहे. (three marathi movie select for IFFI Goa)
गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म बाजार’ या गटासाठी दरवर्षी राज्य शासनाकडून मराठी चित्रपट पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्यासाठी किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये आणि संदीप पाटील पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार वरील तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. शासनातर्फे या महोत्सवात सहभागी होण्यासाठी या तीनही चित्रपटाचा एक-एक प्रतिनिधी चित्रपटांबरोबर पाठविण्यात येणार आहे.
हे देखील वाचा – “लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारुन थुंकला आणि…”, किरण मानेंनी शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाले, “तू पाकिस्तानमधील…”
शासनाने यावर्षी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे इच्छुक चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार तब्बल २९ चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानंतर या समितीने या २९ चित्रपटांपैकी ‘ग्लोबल आडगाव’, ‘गिरकी’ आणि ‘बटरफ्लाय’ या तीन चित्रपटांची निवड केली आहे.
हे देखील वाचा – “एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?”, मराठा आरक्षणावरून केतकी चितळेने व्यक्त केली नाराजी, म्हणाली, “सामान्य माणसाला…”
निवड झालेल्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम हिचा ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मीरा वेलणकर यांनी केलं असून ज्यामध्ये मधुरासह अभिनेते महेश मांजरेकर, प्रदीप वेलणकर, अभिजित साटम, असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. तर अनिलकुमार साळवे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये यांसारखे दिग्ग्ज कलाकार झळकले आहेत. तसेच, युवा दिग्दर्शिका कविता दातार यांच्या ‘गिरकी’ चित्रपटाचीही यंदाच्या गोवा चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. यंदाच्या महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात एकही मराठी चित्रपटाची निवड न झाल्याने प्रेक्षक नाराज होता. मात्र, या महोत्सवात आता हे मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहे.