Madhavi Nimkar: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं ‘ ही मालिका प्रचंड गाजली. मालिकेच्या कथानकाला, प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. तसेच या मालिकेत एक भूमिका अशी होती जी अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘शा….लि…नी’ असं म्हणत अभिनेत्री माधवी निमकर हिने प्रेक्षकांचं मन जिंकलं. साडे चार वर्षं मनोरंजन करत या मालिकेनं निरोप घेतला. उत्तम अभिनयान प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा मालिकेत दिसावी, अशी चाहत्यांची इच्छा होती.आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून लवकरच माधवी निमकर नव्या मालिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे यातही ती खलनायिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नुकतीच ‘मटा’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नव्या मालिकेविषयी बोलताना माधवी म्हणाली, “सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतली मी साकारलेली शालिनी खूप गाजली त्यामुळे त्याच्या तोडीस तोड भूमिका हवी होती.. आणि आता पुन्हा खलनायिकेची भूमिका साकारायला मिळाली, तरी त्यात काहीतरी वेगळेपण हवं होतं. या नव्या मालिकेच्या निमित्तानं ते वेगळेपण सापडलं, म्हणून मी ती मालिका स्वीकारली. त्यातही ‘स्टार प्रवाह’ या माझ्या लाडक्या वाहिनीवर मी पुन्हा काम करतेय, याचा आनंद आहे. नव्या मालिकेतील भूमिका खलनायिकेची असली तरी ती शालिनीपेक्षा नक्कीच वेगळी आहे. या भूमिकेवरही प्रेक्षक तितकच प्रेम करतील अशी मला आशा आहे.”
मालिका संपल्यानंतर माधवीनं काही महिने ब्रेक घेतला होता, त्याविषयी तिनं सांगितलं, ‘साडे चार वर्ष एकाच मालिकेसाठी काम केल्यानंतर मला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी थोडा वेळ हवा होता त्यामुळे ती मालिका संपल्यानंतर मी ठरवून पहिले सहा महिने आलेल्या ऑफर्सना नकार देत होते. या सहा महिन्यात मी कलाकार म्हणूनही स्वतः साठी बऱ्याच गोष्टी केल्या कुटुंबासोबत वेळ घालवला. फिरायला गेले. आराम केला. झोप पूर्ण केली. आता पुन्हा नव्या जोमाने आणि ऊर्जेने काम करण्यस सज्ज झाले आहे. हा ब्रेक गरजेचा होता’ मालिकेत प्रेमकहाणी दाखवली जाणार असल्याचं समजतं. तर छोट्या पडद्यावरचे लोकप्रिय चेहरे यात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत, असंही कळतं.’
तसेच ही कौटुंबिक मालिका असून त्याचं शीर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र माधवी पुन्हा एकदा खलनायिकाची भूमिका साकारणार आणि नेहमीपेक्षा तिची वेगळी भूमिका असेल, याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पण ती पुन्हा मालिकेत दिसणार असल्याचं समजतात चाहते सुखावले आहेत.





