सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वातही लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. प्रसाद जवादे व अमृता देशमुख ही प्रेक्षकांची लाडकी जोडी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा उरकला. यांनतर अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नाचे फोटो अचानक समोर आले. यानंतर आता लवकरच स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी तसेच प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन ही कलाकार जोडीही विवाहबंधनात अडकणार आहे. (Dhruva Datar Wedding)
यांनतर आता एक मराठमोळा अभिनेताही लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याच्या साखरपुड्याच्या फोटोंनीही सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हा अभिनेता म्हणजे ‘तू चाल पुढं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ध्रुव दातार. ‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेत शिल्पीच्या खास मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता ध्रुव दातार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या ध्रुव ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत काम करत आहे.
१४ मे रोजी नातेवाईक व मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत ध्रुवचा साखरपुडा कार्यक्रम पार पडला. अभिनेत्याने कोरिओग्राफर असलेल्या अक्षता तिखेला जीवनसाथी मानले आहे. लवकरच ध्रुव व अक्षता यांचं लग्नसोहळा पार पडणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या घरी सुरु असलेल्या लग्नविधींचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून त्याचे ग्रहमख व हळदीचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचा अत्यंत सोज्वळ लूक पाहणं रंजक ठरतंय. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या ध्रुव ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत मुख्य अभिनेता अक्षर कोठारीच्या भावाची म्हणेजच राहुल चांदेकरची भूमिका साकारत आहे.