महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व महत्त्वाचं नाव म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले विलासराव देशमुख आजही अनेकांच्या लक्षात आहेत. विलासराव देशमुखानंतर अमित देशमुख व धीरज देशमुख ही त्यांची मुलं त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. अमित २००९ पासून लातूर शहराचे आमदार आहेत. तर त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. अशातच धीरज देशमुखही यंदा लातूरमधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रितेश देशमुख मैदानात उतरले आहेत. (, Riteish Deshmukh Dheeraj Deshmukh Campaign)
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखदेखील भावांच्या प्रचारासाठी लातुरमध्ये पोहोचला होता. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदावर काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी युवा मेळाव्यात रितेशनं जोरदार भाषण केलं. रितेशच्या भाषणाचं व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘झापुक झुपूक’ म्हणत रितेशनं धीरज देशमुख यांना मतदान करा असं जनतेला आवाहन केलं. “युवकांची साथ सोबत असल्याने आता महाविकास आघाडी सरकार येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – मित्राच्या मुलीचा जीव धोक्यात, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं मदतीचं आवाहन, पोस्ट व्हायरल
या व्हिडीओमध्ये रितेशने असं म्हटलं आहे की, “हा समोर जो जनसागर आहे ती खरी तर लीड आहे. ही जी सभा आहे. ती धीरज विलासराव देशमुख यांच्या लीडची सभा आहे. धीरज भैय्या हा जो जनसागर आहे, ही खरं म्हणजे पावती आहे पावती… तुमच्या कामाची. ही पावती आहे तुम्ही जनतेची कामे केली आहेत, त्याची आहेत आणि तुम्ही ज्या लोकांसाठी संघर्ष करत आहात, त्यांच्या श्रद्धेची गर्दी आहे. ही पावती आहे तुमच्या निष्ठेची आणि लातूरच्या स्वाभिमानाची. हा स्वाभिमान तुम्ही राखत आहात हा स्वाभिमान केवळ स्वत:चा नाही, स्वर्गीय विलासराव देशमुखांचा नव्हे तर इथल्या प्रत्येक माणसाचा स्वाभिमान राखण्याचा काम धीरज तुम्ही करत आहात आणि याचा मला अत्यंत अत्यंत अभिमान आहे”.
या प्रचाराआधी सोशल मीडियावर रितेशने धीरज देशमुख यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. “धीरज विलासराव देशमुख यांना माझं मत आहे”. असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. दरम्यान, लातूर शहरात अमित देशमुखांविरुद्ध भाजपाने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली आहे. अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरच त्या अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार ही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे लातूरमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.