बॉलिवूड अभिनेते ऋतुराज सिंह यांचे काल (२० फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात सुधारणा होऊन ते घरी परतल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
ऋतुराज यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. काल सकाळी अभिनेत्याचे निधन झाले. अमित बहाल या त्यांच्या जवळच्या मित्राने निधनाच्या बातमीया दुजोरा दिला होता. कालपासून ऋतुराज यांच्या चाहत्यांमध्ये व सहकलाकारांमध्ये दु:खाचे वातावरण असून ऋतुराज यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत एक वेगळीच पोकळी निर्माण झाली आहे.
अशातच अभिनेत्यावर आज मुंबईमध्ये अंतिम संस्कार पार पडले आहेत. ऋतुराज यांच्यावर शेवटचे अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांचे खास मित्र, नातेवाईक, आत्पेष्ट त्याचबरोबर सिनेजगतातील अनेक कलाकारही उपस्थित होते. ऋतुराज यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांसह छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेते नकुल मेहता, हितेश तेजवानी, अनुप सोनी यांसह अनेक कलाकार ऋतुराज यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले होते.
दरम्यान ऋतुराज यांच्या कुटुंबियांनी जड अंत:करणाने ऋतुराज यांना शेवटचा निरोप दिला असून यावेळी कुटुंबियांमसह उपस्थित अनेक मंडळी त्यांना निरोप देताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराज यांच्या शेवटच्या क्षणांचे काही फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हायरल व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.