यंदाचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार पटकावत वाहवाह मिळवली. या सोहळ्यामध्ये एका गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री करिना कपूर हे दोघेही यानिमित्त एकमेकांसमोर आले. दोघांचाही या सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील दोघांच्याही कृतीमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. (Shahid kapoor and Kareena Kapoor Video)
‘जब वी मेट’, ‘उडता पंजाब’ या चित्रपटांध्ये शाहिद व करीना यांनी एकत्र भूमिका केल्या आहेत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. दोघेही लग्न करून आपापल्या आयुष्यात स्थिर झाले. पण पुन्हा एकदा दोघेही पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकमेकांसमोर आल्याने भलतीच चर्चा रंगली. शिवाय दोघांच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे होते.
पुरस्कार सोहळ्यामध्ये रेड कार्पेटवर शाहिद हातात ट्रॉफी घेऊन उभा होता. त्याच्याबरोबर त्यावेळी अजून दोघेजण उभे होते. त्यावेळी करीना त्याच्यासमोरुन जाते आणि शाहिदबरोबर उभ्या असलेल्या दोघांशी हसून हात मिळवते. यावेळी शाहिददेखील करीनाकडे बघतो आणि हसतो. पण शाहिदसमोर न थांबता करीना पुढे निघून जाते. पुरस्कार सोहळ्याला करीनाने सोनेरी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. शाहिददेखील काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसून आला.
शाहिद व करीना या जोडीची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा असायची. दोघंही जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. पहिल्याच भेटीत शाहिद करीनाला आवडला असल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. याबरोबरच सुरुवातीला शाहिदला मेसेज व फोन करत असल्याचेही तिने कबूल केले होते. काही कालावधीनंतरच शाहिदने करीनाच्या प्रपोजलचा स्वीकार केला. २००६मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर तिने सैफ अली खानबरोबर लग्न केले. शाहीदही मीरासह लग्नबंधनात अडकला. करीना व सैफ यांना तैमुर व जेह ही दोन मुलं आहेत आणि शाहिद व मीरा यांना मीरा व जैद ही मुलं आहेत.