रमेश भाटकर हे मराठीतील दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेते होते. या कलाकाराने त्यांच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत एक काळ गाजवला. पण, या हरहुन्नरी अभिनेत्यावर १७ वर्षांच्या अभिनेत्रीकडून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीबरोबरच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. रमेश भाटकर यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांमुळे सिनेसृष्टी हादरली होती. या काळात त्यांना अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. मात्र रमेश व मृदुला यांनी अगदी शांतपणे ही परिस्थिती हाताळली. त्यांच्या या कठीण काळाबद्दल पहिल्यांदाच रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी भाष्य केलं आहे. (Mridula Bhatkar on son wedding invitation)
‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत मृदुला यांनी असं म्हटलं आहे की, “तेव्हा रमेशचं रिव्हिजन होतं. म्हणजे त्याला जिल्हा न्यायालयाने डिस्चार्ज केलं होतं आणि सरकारने त्याचं रिव्हिजनच टाकलं. तर ते मला कळलंच नव्हतं की ते का टाकलं आणि त्यात काय होतं. पण सरकारने ते टाकलं. आता रिव्हिजन टाकल्यावर कायदेशीररित्या लढणं आम्हाला भाग होतं. रमेश त्यावेळेस आरोपी नव्हता. पण तो पार्टी होता. त्याचं मॅटर होतं. त्यामुळे सरकार विरुद्ध रमेश भाटकर अशी ती केस होती. तो आरोपी नव्हता. तो सुटला होता. पण उच्च न्यायालयासमोर जर केस असेल आणि मला तेव्हा प्रश्न पडला की, हर्षवर्धन आणि सुप्रियाचं लग्न होतं तर आमंत्रण देतोय म्हटल्यावर पत्रिकेवर रमेश आणि मृदुला कसं लिहिणार? कारण मग ते आमंत्रण पार्टीकडून दिलं गेलं असं असेल”.
यापुढे त्या म्हणाल्या की, “त्यामुळे यावर हर्षवर्धन आणि सुप्रिया यांनी असा तोडगा काढला आणि आम्हीही असं ठरवलं की त्यांच्या वतीनेच आमंत्रण द्यायचं. त्यामुळे आम्ही एका साध्या कागदावर लग्नाला या असं आमंत्रण लिहिलं आणि त्या दोघांची पत्रिका त्यांनीच छापली. म्हणजे आम्ही इतकी पथ्ये पाळली की, रमेशबरोबर कोणत्याही न्यायमूर्तीचा फोटो नाही. एका बाजूला रमेशच्या क्षेत्रातली सगळी कलाकार मंडळी आणि एका बाजूला माझ्या क्षेत्रातली नायधीश आणि न्यायमूर्ती वगैरे होती”.
आणखी वाचा – “जगायची इच्छाच नव्हती आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शारीरिक अवस्था, “माझ्या आयुष्याचा एक भाग…
दरम्यान, ‘माहेरची माणसे’, ‘दुनिया करी सलाम’, ‘अष्टविनायक’ अशा अनेक चित्रपटांतून रमेश यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’ अशा मालिकांमधील त्यांच्या भूमिका मोठ्या प्रमाणात गाजल्या. त्याबरोबरच त्यांनी अनेक नाटकांमध्येही मुख्य भूमिका केल्या होत्या. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टी हळहळली होती.