टेलिव्हिजनमधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री तनाज इराणी या अभिनेत्रीने स्वतःची एक अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील हृतिक रोशन, अभिषेक बच्चन अशा बड्या कलाकारांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र सध्या गेल्या अनेक वर्षांपासून ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. खूप काळापासून ती आजारी आहे. याबद्दल तनाजने तिच्या आयुष्यातील वाईट प्रसंगाबद्दल सांगितले आहे. २०२१ साली तिला अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला होता. खूप काळ ती व्हीलचेअरवरदेखील होती. त्याबद्दल तिने आता एका पॉडकास्टवर सांगितले आहे. या सगळ्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला? हेदेखील तिने संगीतले आहे. (tannaz irani on health)
तनाज नुकतीच ‘हॅबीट’ या पॉडकास्टमध्ये उपस्थित राहिली होती. ती यावेळी म्हणाली की, “२०२१ साली मला चालण्यासाठी समस्या येत होत्या. मला वाटलं की हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. कदाचित माझं वजन वाढलं आहे आणि यासाठी मी डॉक्टरकडे जाण्याचाही विचार केला. माझ्या पाठीमध्ये काही प्रॉब्लम आहेत का? मी यापेक्षा अजून काही चांगले करु शकते का? माझं वजन वाढलं असं मला वाटलं म्हणून मी एमएमएमध्ये सहभागी झाले. त्यामुळे माझ्या समस्या अधिक वाढल्या. मी जाऊन माझ्या पाठीचे उपचार सुरु केले. त्यावेळी माझ्या मणक्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं समजलं. त्यावेळी मी तब्बल तीन वर्ष यावर उपचार सुरु केले”.
पुढे ती म्हणाली की, “माझी पाठ ठीक झाली आहे पण माझ्या पायावर मी वजन नाही टाकू शकत. मी लंगडत चालत होते. त्यानंतर मी एमआरआय केला. माझ्या गुडघ्यामध्येदेखील समस्या आल्याचेदेखील समजले. पण माझ्या शरीरात खूप गडबड झाली होती. माझे घोटे, गुडघे व पाठ सगळंच बिघडलं होतं”. दरम्यान तनाजची हिप रिप्लेसमेंट सर्जरीदेखील करण्यात आली. या शस्त्रक्रियेबद्दल ती म्हणाली की, “शस्त्रक्रियेनंतर जेव्हा मला त्यांनी उभे केले तेव्हा मला जाणवलं की माझा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लांब होता आणि मी खूप घाबरले होते. मी खूप जोरात ओरडले. माझा विश्वास बसत नाही की मी पूर्ण आयुष्यभर असेच चालणार आहे ते. मला अजिबात जगायची इच्छा नव्हती”.
तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तिने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी फरीद करीमबरोबर लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षांनी तिची भेट बख्तियार इराणीबरोबर झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न केले. ती आता 3 मुलांची आई असून तिच्या खासगी आयुष्यात खूप खुश आहे. सध्या अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.