Late Actor Farooq Shaikh Wife Roopa Jain Dies : बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध व दिवंगत अभिनेते फारूख शेख यांच्या पत्नी रूपा जैन यांचं निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर तब्बल ११ वर्षांनी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. या जोडप्याच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या शबाना आझमी यांनी रूपा जैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. फारुख शेख यांनी ११ वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला होता. आता त्यांची पत्नी रूपाही हे जग सोडून गेल्या आहेत. फारुख व रूपाच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या शबाना आझमी यांनी सांगितले की, ही दुःखद बातमी २९ ऑक्टोबरला सकाळी समोर आली.
‘झूम’शी संवाद साधताना शबाना म्हणाल्या, “फारूक व रूपा कॉलेजपासून माझे जवळचे मित्र होते. ते एकमेकांशी किती जोडलेले आहेत हे आम्हा सर्वांना माहीत होते. फारुखच्या आकस्मिक मृत्यूतून रूपा सावरली असेल असे मला वाटत नाही. आपल्या दोन्ही मुलींना सांभाळण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करत राहिली”. आपला जीवनसाथी गमावल्याच्या दुःखाने रुपाला कधीच सोडले नाही, असे त्यांनी सांगितले.
जवळच्या मित्रांचे म्हणणे आहे की, एके दिवशी ती सुद्धा दुसऱ्या जगाच्या प्रवासात आपल्या पतीबरोबर सामील होईल या आशेने तिचा एकटेपणा संपण्याची वाट पाहत होती. फारुख शेख व रूपा जैन यांच्या प्रेमकथेबद्दल सांगायचे तर, मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये रंगभूमीवर सक्रिय असताना दोघेही एकमेकांना भेटले. लग्नापूर्वी ते जवळपास नऊ वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. फारूक व रूपा या जोडप्याला दोन मुली आहेत आणि त्यांची नावे सना व शाइस्ता अशी आहेत.
फारुख शेख यांचे २८ डिसेंबर २०१३ रोजी दुबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा अभिनेते ६५ वर्षांचे होते. मुस्लिम कब्रस्तान, चार बंगला, अंधेरी पश्चिम येथे त्यांच्या आईच्या कबरीजवळ त्याचे दफन करण्यात आल्याचे सांगितले जाते.