स्वप्नांची पूर्तता ज्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीशी जोडलेली असते, ती म्हणजे हक्काचं घर घेणं. मेहनतीच्या आणि कमाईच्या बळावर स्वत:चं घर खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो. त्यासाठीचे प्रयत्न करत असतो. सामान्य माणसाबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचेही नवीन घर घेण्याचे स्वप्न असतं. असेच स्वप्नपुर्तीची इच्छा असलेले मराठी कलाकार म्हणजे तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर व अभिनेता हार्दिक जोशी. हार्दिक-अक्षया ही जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि लोकप्रिय झाली. (Akshaya Deodhar desire to buy a new house)
राणादा आणि अंजली या भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेनंतर दोघेही काही मालिका व कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशातच आता अक्षया देवधर पुन्हा एकदा झी मराठीरीलच ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २३ तारखेपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच मालिकेच्या निमित्ताने मालिकेतील मुख्य अभिनेत्री अक्षया देवधरने इट्स मज्जाशी खास संवाद साधला. यावेळी तिने त्यांना भविष्यात नवीन घर घ्यायची इच्छा व्यक्त केली.
आणखी वाचा – उस्ताद झाकीर हुसैन अनंतात विलीन, परदेशात पार पडले अंत्यसंस्कार, कुटुंबियांनी जड अंत:करणाने दिला निरोप
याबद्दल अक्षया असं म्हणाली की, “हो, नुकतीच गाडी घेतली. मग हवं तसं काम करायचं आहे. अशीच एक इच्छा आहे ती म्हणजे नवीन घराची. सध्या आमच्या दोघांच्या रडारवर एक इच्छा आहे ती म्हणजे नवीन घर घेण्याची. जसं लक्ष्मी निवासचं नवीन घराचं स्वप्न आहे अगदी तसंच हार्दिक-अक्षयाचे पण घर घेण्याचं स्वप्न आहे. आम्हाला आमच्या स्वप्नातील घर बनवायचं आहे. हार्दिक माझ्यासाठी आणि मी हार्दिकसाठी फक्त घरासाठीच स्वप्न बघत आहे”.
यापुढे ती असं म्हणाली की, “याबद्दल फक्त आम्हालाच माहीत आहे आणि आम्हा दोघांनाही तीच एक इच्छा आहे की, आई-वडिलांचं नाही तर आपल्याला आपलं स्वत:चं घर तयार करायचं आहे. तर त्याचेच नियोजन सध्या सुरु आहे”. दरम्यान, तीन वर्षांच्या ब्रेकनंतर अक्षया पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अक्षयाची भूमिका काय असेल? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.