प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, झाकीर हुसैन हे अनेक दिवसांपासून आरोग्यासंबंधीत विविध समस्यांनी त्रस्त होते. पण रविवारी १५ डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उस्ताद झाकीर हुसैन यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचार सुरू होते. रविवारी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र रविवारी संध्याकाळी झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Ustad Zakir Hussain Funeral)
अशातच आता त्यांच्यावर गुरुवारी सॅन फ्रान्सिस्को येथे अंत्यसंस्कारही पार पडले. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, हुसैन यांना निरोप देण्यासाठी ड्रमर आनंदन शिवमणीही पोहोचले होते. हुसैन यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया मिनेकोला, मुली अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी, त्यांचे भाऊ तौफिक कुरेशी आणि फजल कुरेशी आणि बहीण खुर्शीद औलिया असा परिवार आहे. झाकीर हूसैन यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी केले आणि यात त्यांनी असं म्हटलं की, “जगभरातील असंख्य संगीत प्रेमींनी जपलेला एक असाधारण वारसा त्यांनी मागे सोडला आहे, ज्याचा प्रभाव पुढील पिढ्यांपर्यंत राहील”.
झाकीर हुसैन हे संगीत जगतातील एक मोठे नाव होतं. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म १९५१ मध्ये मुंबईत झाला. झाकीर हुसैन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे. झाकीर हुसैन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित केले.
आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत सुरु होणार नवा अध्याय, अक्षरा देणार गरोदरपणाची खुशखबर, प्रोमो व्हायरल
झाकीर हुसेन यांना भारत सरकारने १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. झाकीर हुसैन यांना १९९० मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता. झाकीर हुसैन यांना ४ वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.