स्टार प्रवाह वाहिनीवर या महिन्यात नव्या मालिकांच्या घोषणा झाल्या आहेत. अलीकडेच २ डिसेंबर रोजी ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका सुरू झाली. तर पुढील काही दिवसात ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तू ही माझा मितवा’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एकीकडे नव्या मालिका सुरू होत आहेत, तर दुसरीकडे जुन्या लोकप्रिय मालिका बंद होताना दिसत आहेत. नुकतंच या वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि ही मालिका म्हणजे ‘सुख म्हणज नक्की काय असतं’. (Sukh Mhanje Nakki Kay Asta Off Air)
‘स्टार प्रवाह’वर दुपारच्या सत्रात सुरू असणाऱ्या ‘लग्नाची बेडी’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका जवळपास ३ वर्ष सुरू होती. यानंतर आता आणखी लोकप्रिय मालिका ऑफ एअर होणार आहे. १७ ऑगस्ट २०२० मध्ये प्रक्षेपित झालेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका तब्बल ४ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेचं शेवटचं शुटींग पार पडलं. यावेळी अभिनेत्री गिरिजा प्रभूने ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला.
या संवादात गिरिजाने तिच्या या मालिकेच्या आठवणी तसंच काही खास किस्से सांगितले आहेत. तसंच यावेळी गिरिजा भावुक झाल्याचेही पाहायला मिळालं. यावेळी गिरिजाने असं म्हटलं की, “या मालिकेच्या आधी मी एका शोमध्ये सहभाग घेतला होता. पण त्यातून मी बाहेर पडले. बाहेर पडल्यामुळे मला खूप दु:ख झालं होतं. तर मी त्या परिस्थितीत असताना मला एक कॉल आला. तर तेव्हा मी त्या मन:स्थितीत नव्हते. पण ठीक आहे कॉल आलाच आहे तर ऑडिशन देते, या विचारात ऑडिशन करुन पाठवली”.
आणखी वाचा – उस्ताद झाकीर हुसैन अनंतात विलीन, परदेशात पार पडले अंत्यसंस्कार, कुटुंबियांनी जड अंत:करणाने दिला निरोप
यापुढे ती म्हणाली की, “दोन-तीन वेळा ऑडिशन दिली. त्यानंतर मी पुण्याला जायचा विचार करत होते आणि इतक्यात मला कॉल आला की मी या मालिकेसाठी निश्चित झाली आहे. तर तेव्हा मी फक्त त्याच विचारात होते की मी त्या शोमधून बाहेर पडले आहे. माझ्या नशिबात ही मालिका लिहिली होती. त्यामुळे तेव्हा मी त्या शोमधून बाहेर पडले. तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या काही कारणास्तव होत असतात ही मी यातून शिकले आहे”.