Lakhat Ek Aamcha Dada : मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. मालिकांच्या कथानकांमधून बऱ्याचदा सामाजिक विषय मांडले जातात. तर काही स्त्रियांविषयी भाष्य करणाऱ्या कथा छोट्या पडद्यावर मांडण्याचा निर्माते-दिग्दर्शकांचा हेतू असतो. अशीच एक मालिका सध्या प्रेक्षकवर्गामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे आणि ही मालिका म्हणजे ‘लाखात एक आमचा दादा’. काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका सुरु झाली. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. आईचं निधन झालं असताना घरातील कर्ता मुलगा त्याच्या चार बहिणींचा सांभाळ करतो. तर वडील दारूच्या आहारी गेल्यामुळे घराकडे दुर्लक्ष करतात. या भोवतीच फिरणारी मालिकेची ही कथा आहे. या मालिकेतील एक सीन सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. (Lakhat Ek Aamcha Dada Serial Update)
झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘लाखात एक आमचा दादा’चा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये मासिक पाळीविषयी भाष्य करण्यात आलं आहे. मालिकेतील सूर्या दादाची सगळ्यात लहान बहीण भाग्यश्रीला पहिल्यांदाच मासिक पाळी येते. पण तिला याबाबत काहीच समजत नाही. घरात कोणीही नसताना ती घाबरुन सूर्या दादाला हाक मारते. रक्त दाखवते. यानंतर निर्माण झालेली परिस्थिती सूर्या कशा पद्धतीने सांभाळतो हे खरंच कौतुकास्पद आहे.
भाग्यश्री भांडी घासत असताना सूर्या तिला म्हणतो, “अंग तू पण खरेदी करायला जायचं ना”. यावर भाग्यश्री म्हणते, “अरे माझ्या पोटात दुखत आहे”. “मग भांडी कशाला घासत बसली” असं पुन्हा सूर्या म्हणतो. भांडी घासून आरामच करणार असल्याचं भाग्यश्री उत्तर देते. पण हे सगळं घडत असताना भाग्यश्री जागेवरुन उठते आणि तिला रक्त दिसतं. ती हा संपूर्ण प्रकार सूर्या दादाला सांगते. त्याला रक्त दाखवते. घाबरुन सूर्याही डॉक्टरांना बोलावण्यासाठी पळतो. संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर बहिणीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली असल्याचं सूर्याला लक्षात येतं. डॉक्टरकडे न जाता तो जागेवरच थांबतो.
हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी अगदी मालिकेचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. “खूप मस्त विषय कोणत्याच मालिकेमध्ये असं दाखवलं जात नाही”, “आईशिवाय मुलींसाठी खूप अवघड असतं”, “अशा मालिका दाखवा खूप चांगलं वाटतं. महिलांचा आदर करणारी मालिका”, “असेच विषय मांडत राहा” अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी हा प्रोमो पाहून केल्या आहेत. आता सूर्या दादा आपल्या बहिणीला कसं समजवणार? तिची कशाप्रकारे मदत करणार हे पाहणं आणखी रंजक ठरणार आहे.