Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’मधील एक नाव सध्या बरंच गाजतंय. या नावामुळे ‘बिग बॉस’चंही घर गाजवतंय आणि हे नाव म्हणजे गोलीगत फेम सूरज चव्हाण. गेल्या काही दिवसांपासून सूरज हा ‘बिग बॉस मराठी ५’मुळे बराच चर्चेत आला आहे. सुरुवातीपासून सूरजचा खेळ ही प्रत्येकाला आवडत आहे. त्याचप्रमाणे घरातले ज्याप्रमाणे त्याच्याशी वागत आहेत, त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याची खेळी पाहून आणि त्याचा स्वभाव पाहून अनेकजण त्याच्याबद्दल आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि त्याला पाठींबा देत आहेत. अशातच आता सूरजसाठी उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे व मराठी अभिनेता अस्ताद काळेने खास पोस्ट शेअर केल्या आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily update)
अभिनेता आस्ताद काळे याने त्याच्या सोशल मीडियावर सूरजसाठी पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने पु.ल देशपांडे यांच्या हरी तात्या या व्यक्तिचित्राचा संदर्भ दिला आहे. आस्तादने त्याच्या या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “पु.ल देशपांड्यांच्या ‘हरी तात्या’ या व्यक्तीचित्रात एक भाग आहे.”हरी तात्यांनी कधी आम्हाला पैशाचा खाऊ नाही दिला. पण आमच्या लहानग्या जीवांमधे एक अभिमान मात्र भरला. इवल्याशा मनगटांमधे छोट्याशा मनगट्या बांधल्या. त्या हातांची मूठ बनवायचं शिक्षण नकळत दिलं. दुर्दैवानं ही मूठ प्रत्येकवेळी वळतेच असं होत नाही, पण अगदीच गरज पडली तर वळू शकेल, हा विश्वास आजही कुठेतरी वाटतो, तो हरी तात्यांमुळेच”. ‘सूरज चव्हाण’साठी त्याचं आयुष्यच या बाबतीत ‘हरी तात्या’ आहे. उगाच मनगटं परजत, मुठी आवळून फिरत नाही तो. पण वेळप्रसंगी तो मूठही आवळेल, आणि अंगावर आलेल्यांना शिंगावरही घेईल. हा खरा मराठी मातीतला काटक, कसलेला मावळा वाटतो.सूरज, मित्रा. तुला खूप यश लाभो”.
आस्तादबरोबर उत्कर्ष शिंदेने सूरजचं कौतुक केलं आहे. “निक्की, जान्हवी, अरबाज १, अरबाज २ (वैभव) तुला काय घाबरले राव. सूरज तुझ्या हिंमतीपुढे सगळे आज पाणीकम चाय वाटले. तुला शिंदेशाही सलाम”. तसंच जयनेही सूरजच्या खेळाचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “सूरज भावा तुला खूप खूप प्रेम, तुझा खेळ असाच चलाऊ राहुदेत. लढ भावा”. याचबरोबर त्याने पुढे असं म्हटलं आहे की, “बिग बॉस वैभवला आता बाहेर काढा. अरबाजसाठी सूरज एकटा पुरेसा आहे. वैभवला ज्यासाठी घेतलं आहे, ते सूरजच करत आहे”.
दरम्यान, कॅप्टन्सी टास्कसाठी सूरज अरबाजबरोबर नडताना पाहायला मिळाला. त्याच्या या दमदार खेळीबद्दल अनेक कलाकारांनी व सूरजच्या प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. अनेकांनी कमेंट्स करत सूरजच्या गेमचं कौतुक केलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील खेळ समजून घेल्यानंतर सूरज आता खऱ्या अर्थाने मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारच्या भागात सूरजच्या खेळाने इतर स्पर्धकांनच्या नाकात दम आणला होता.