Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये काल कॅप्टन्सी टास्क पार पडला आणि अरबाज पटेल हा नवीन कॅप्टन झाला. कॅप्टनीसाठी निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज, निखिल, घन:श्याम आणि योगिता या स्पर्धकांमध्ये टास्क खेळवण्यात आला. ज्या स्पर्धकाकडे खेळाच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त फ्रेंच फ्राइस असतील तो सदस्य या आठवड्यात कॅप्टन होणार होता. निक्कीच्या टीममधील एकूण चार स्पर्धक कॅप्टन्सीचे दावेदार होते त्यामुळे साहजिकच त्यांनी ग्रुप करून हा टास्क खेळला आणि अंतिम फेरीपर्यंत निखिल, योगिता, सूरज असे सगळे प्रतिस्पर्धी खेळाडू बाद होऊन अरबाज या आठवड्यात घराचा कॅप्टन झाला. (Bigg Boss Marathi 5 Paddy kamble Emotional)
या कॅप्टन्सी टास्कनंतर ‘बिग बॉस’ने घरातील सर्व सदस्यांना लिव्हिंग परिसरात बोलावलं आणि त्यांना एका नवीन टास्क दिला तो म्हणजे त्यांच्या ज्या व्यक्तीबरोबर त्यांना संवाद साधायचा आहे त्यांना कॉल करण्याचा. टास्क खेळताना घरातील सर्व सदस्य खेळाडू दिसले पण त्यांच्यातील माणुसकी व माणूसपणा दिसला नाही. हा खेळ केवळ कार्याचा नसून मानवी भावाभावनांचा आहे असं ‘बिग बॉस’ने सांगितलं आणि यावेळी त्यांनी घरातील सर्व सदस्यांवर एक माणूस होण्याचे कार्य सोपवले. या कार्यात सर्वांना त्यांच्या आठवणीतील व्यक्तींना फोन लावायचा होता. या कार्यात घरातील सर्व सदस्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तींना फोन लावला आणि यावेळी सर्वचं सदस्य भावुक झाले.
या कार्यात पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांनी आपल्या आईला काल्पनिक फोन लावला. या फोनवर त्यांनी संवाद साधताना असं म्हटलं की, “हॅलो… मी बरा आहे. दादा गेल्यावर आमचा बाप पण तूच झालीस. आमचे सगळे कष्ट बघितलेस. पण जेव्हा यश बघायची वेळ आली तेव्हा तू नव्हतीस. आज तुझ्या बाळाचं यश बघायला तू नाही. लोक त्याच्यावर किती प्रेम करतात, पेपरमध्ये फोटो येतात, मोठमोठ्या समारंभात खूप मानाने फिरतो तुझा बाळा”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आणखी काही वर्ष हे सगळं बघायला हवी होतीस तू. माझ्या हातावर जीव सोडलास ना… तुझी खूप उणीव भासते. मित्रांच्या घरी जातो, त्यांच्या आईंना बघतो तेव्हा तुझी खूप आठवण येते”. दरम्यान, या फोनवर बोलताच पॅडी खूप भावुक झाले. फोनच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांच्या डोळ्यांतून अश्रु वाहत होते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर डीपी म्हणजेच धनंजय पोवार यांनी पॅडी यांना धीर दिला.