Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये आल्यापासून छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे चांगलाच चर्चेत आहे. तो सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्याशी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार! असंही त्याने सगळ्यांना सांगितलं आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ सुरु होऊन काही दिवस झाले आहेत. तेव्हापासूनच त्याची या घरात व घराबाहेर चर्चा होताना दिसत आहे. अशातच या घरात छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीची चांगलीच मैत्री झालेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये निक्की घन:श्यामला मिठी मारताना दिसली. तसेच तिने घन:श्यामला गालावर पप्पीदेखील दिली. निक्कीकडून किस मिळताच घन:श्यामच्या चेहऱ्यावर सुंदर हसू फुललं होतं. (Bigg Boss Marathi 5 daily update)
नुकत्याच झालेल्या एका भागात निक्की व घन:श्याम हे दोघे हातात हात घालून बसले होते. घन:श्याम निक्कीच्या मांडीवर डोकं टेकून झोपला होता. या सर्वच गोष्टींची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आणि घराबाहेर चर्चा रंगली. घन:श्यामच्या या वागण्याची सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. यावर त्याच्या आईने त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लेकाबद्दल बोलताना त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली. तसंच यावेळी त्या भावुकही झाल्या. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लेकाबद्दलची भावना व्यक्त केली आहे. यावेळी “निक्कीच्या टीमबरोबर घनःश्याम खेळत आहे. त्याच टीमबरोबर तो पुढपर्यंत खेळेल का?” असा प्रश्न घन:श्यामच्या आईला विचारण्यात आला.
तेव्हा त्या म्हणाल्या की, “तो त्याच टीमबरोबर खेळणार का? हे आम्हालाही सांगता येणार नाही. मला तरी वाटतं दिसतं तसं नसतं म्हणूनच सारं जग फसतं. निक्की-घनःश्याम हे बहीण-भावाचं प्रेम आहे. लोक उगाच त्याची चर्चा करत आहेत. टीममध्ये प्रत्येकजण एकमेकांबरोबर आहेतच. आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. त्यामुळे टीमने काम करण्याची आम्हाला सवय आहे. तो लहान आहे. त्यामुळे त्याच्या बाजूने असलेल्या माणसांचं काय झालं तर तो समोरच्या टीमवर भडकतो. म्हणून बाकीच्यांना वाटतं की, तो चिडका आहे. पण एक आई म्हणून सांगते की, तो जितका भडकतो तितकाच तो नारळाच्या पाण्यासारखा आतून गोड आहे. हे मी आत्मविश्वासाने सांगते.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “तो अजूनही लहान आहे. सहा वर्षांचा होईपर्यंत तो आमच्या हातातच होता. गावापासून ते महाराष्ट्रापर्यंत लोकांचा त्याच्या पाठीवर हात आहे. माझा मुलगा लहान आहे, त्याचं वय कमी, उंची नाही तर लोकांनी त्याच्या एकाही शब्दाचा राग धरु नये. तो काही लोकांवर चिडत आहे. पण त्याच्यावतीने मी सगळ्यांची माफी मागते. घनःश्यामला समजून घ्या. देवाने त्याला संधी दिली आहे तर त्याला तुमच्याबरोबर खेळू द्या”.