Marathi Actress Buy New Home : मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं घर असणं ही अनेकांसाठी आयुष्यभराची स्वप्नपूर्ती असते. या स्वप्नासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागते आणि जेव्हा ते साकार होतं, तेव्हा तो क्षण आयुष्यातील सर्वात आनंदाचा ठरतो. आता हेच स्वप्न पूर्ण केलं आहे मराठी अभिनेत्री मिनल बाळ हिने. मिनलने नुकतंच मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून गृहप्रवेश आणि वास्तुशांतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. जांभळ्या रंगाची साडी, मोजके दागिने आणि साधा मेकअप असा पारंपरिक लूक करत मिनलने गृहप्रवेश सोहळा साजरा केला. नवऱ्यासोबत पूजा करतानाचे क्षण, घराची झलक आणि नवीन घराच्या चाव्यांचा फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, फोटो समोर

‘स्वप्नपूर्ती वास्तुशांत… बाप्पा मोरया, स्वामी कृपा,’ असं भावनिक कॅप्शन देत मिनलने नवीन आयुष्याची सुरुवात जाहीर केली. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कामाबद्दल बोलायचं झालं तर, मिनलने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ठसा उमटवला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ तसेच ‘लग्नाची बेडी’, मधील ‘रजनी’, ‘वसुधा’ मधील ‘सारिका’ या भूमिकाही विशेष गाजल्या. याशिवाय ‘जाऊ नको दूर बाबा’ आणि ‘कळत नकळत’ या मालिकांमधूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती. अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मिनल बाळसाठी हे नवीन घर म्हणजे तिच्या कष्टांचं फलित आहे. चाहत्यांकडून तिला नव्या घरासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.




