छोट्या पडद्यावरील ‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेत अप्रतिम भूमिका साकारत अभिनेता महेश जाधव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेलं ‘टॅलेंट’ ही व्यक्तिरेखा बरीच लोकप्रिय झाली. पुढे त्याने ‘कारभारी लय भारी’ काम केलं. एवढच करुन तो थांबला नाही तर ‘फकाट’, ‘माऊली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. या क्षेत्रासह नुकतच त्याने आणखी एका क्षेत्रात यश मिळवलं आहे. (Mahesh jadhav won gold medal)
अभिनयाव्यतिरिक्त महेश गेली अनेक वर्षे पॉवरलिफ्टिंगच्या तयारी करत होता. त्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. त्यामुळे नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॉम्पियनशिप’मध्ये पुरुषी ४९ किलो वजनी गटात त्याने सुवर्णपदक पटकावलं आहे. सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर त्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आणखी वाचा – “भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
तो लिहीतो, “शाळेत प्रार्थनेच्या रांगेत नं. 1 ला उभा ‘Height’ मुळे, आज तुमच्यासमोर हे Gold घेऊन उभा ‘Fight ‘ मुळे”. आज तुम्हाला सांगायला आनंद होताये की 2nd Maharashtra State Para Powerlifting Championship 2023- 24 कल्याण येथे झाली. त्यामध्ये Men’s 49Kg मध्ये मी Gold मेडल मिळवले आहे. यामागे खूप मेहनत तर आहेच पण त्याचबरोबर खूप लोकांचा सल्ला, मार्गदर्शनही आहे. यात मला माझे कलीम सर ,माझा मित्र विनोद तावरे याचे खूप सहकार्य मिळाले. तसेच एखाद्या खेळाडूला Practice, Workout बरोबर Diet पण खूप important असतो. तसं माझं काय खाऊ काय नको हे बघणारी डॉक्टर आणि मला कायम सपोर्ट करत आलेला माझा खूप मोठ्ठा असा मित्रपरिवार, या सगळ्यांचा मी आभारी आहे”, असं म्हणत त्याने या यशामागे ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे आभार मानले.
तसेच पुढे तो लिहीतो, “तुम्ही प्रेक्षक कायम माझ्यावर प्रेम करत आला आहात तर ही दुसरी Innning तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो”, असं म्हणत प्रेक्षकवर्गाच्या प्रेम व सहकार्याचेही आभार मानले. त्याच्या या पोस्टवर कलाकारांसह नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेता निखिल चव्हाण लिहितो, ‘जिद्दीच उत्तम उदाहरण आहेस तू… अभिनंदन खूप खूप प्रेम’, असं लिहित त्याचं कौतुक केलं आहे. तर बऱ्याच नेटकऱ्यांनी, ‘congratulations’ म्हणत त्याच्या कामगिरीसाठी अभिनंदन केलं आहे.