अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनयाने व लिखाणाने प्रेक्षकांसमोर व्यक्त होत असतात. या कलाकारांपैकी एक लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेता घरोघरी पोहोचला आहे. त्याच्या विनोदाचं जबरदस्त टायमिंग, हटके विनोद शैली ही त्याला इतर कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळं ठरवते. कुशल अभिनयासह सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो शेअर करत असतो. त्याचबरोबर त्याच्या फोटोखालचे कॅप्शनही अनेकदा लक्ष वेधून घेतात.
अशातच कुशलने नुकतेच त्याचे काही स्टायलिश फोटो शेअर केले असून या फोटोखाली लिहलेल्या कॅप्शनने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोखाली कॅप्शनमध्ये कुशलने असं म्हटलं आहे की, “सुरवातीच्या काळात मी ट्रेन ने भरपूर प्रवास केला, तिथले पाळायचे नियम आणि टाळायचे नियम मला ट्रेन्सच्या टाईमटेबल सारखेच पाठ होते. ट्रेनमध्ये भजनात रमणारे दर्दी पाहिले, तशीच डब्यातली गुंडा-गर्दी पाहिली. काळ्या कोटाची भीती त्या प्रवासात जी मनात भरली ती पुढे आयुष्याच्या प्रवासात कायम राहिली.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “बकासुरासारखी माणसांचे लोंढे गिळणारी ही ट्रेन, कुठे तरी जाऊन पुन्हा माणसं ओकते.’ असले भयंकर विचार तेव्हा मनात यायचे. आपली ट्रेन सुटू नये म्हणून रोज धावपळ करणाऱ्या मलाही ट्रेन एकदाची कायमची सुटावी असं वाटत रहायचं. आता ट्रेन कायमची सुटली. पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्यासारखं झालं आहे, जिथे ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरुन निघून जातात. सहप्रवासी बदलत राहतात, पण ‘प्रवास’ मात्र कायम असतो.”
आणखी वाचा – आयुष्मान योगामुळे मेष राशीसह ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, नोकरी-व्यवसायातही मिळेल यश, जाणून घ्या…
कुशलने शेअर केलेल्या या फोटोला त्याच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी या फोटोखाली “तुमच्या फोटोपेक्षा कॅप्शन छान असतात, कलाकार म्हणून तुम्ही मस्त आहातच, पण एक लेखक म्हणूनही तुम्ही मस्त आहात” अशा अनेक कमेंट्सद्वारे कुशलचे कौतुक केले आहे. दरम्यान, कुशल सध्या ‘मॅडनेस माचेएंगे’ या हिंदी विनोदी शोद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.