Kolkata Rape Case : कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ९ ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध, आंदोलनं होतं आहेत. याप्रकरणातील तरुणीला न्याय मिळण्याकरिता अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कलाक्षेत्रातून घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. आपला राग, आपला आक्रोश, आपली चीड हे कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त करताना दिसत आहेत. (Onkar Raut on Kolkata Rape Case)
या लज्जास्पद घटनेबाबत आता सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रेटीही आवाज उचलत आहेत. त्यात केवळ बॉलिवूडकरांचाच नव्हे तर मराठी सेलिब्रेटींचाही समावेश असलेला पाहायला मिळतोय. अशातच आता पीडित डॉक्टर तरुणीला न्याय मिळावा यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिननेता ओंकार राऊतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पीडितेच्या न्यायाबद्दल मागणी केली आहे.

ओंकारने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “जसं ३७० हटवला गेला, जसं राम मंदीर उभारण्यात आलं, जसा अटल सेतु बांधण्यात आला, जसा कोस्टल रोड बनत आहे. तसंच बलात्कार करणाऱ्याला फाशी ही शिक्षा देण्यात यावी आणि तसा कायदा करण्यात यावा. ही सरकारला विनंती”. यापुढे त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेन्शन करत “तुम्हाला हे अगदीच शक्य आहे” असं त्याने म्हटलं आहे.
कोलकता येथे ९ ऑगस्ट रोजी झालेल्या डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणामुळे देशात जागोजागी संतापाची लाट उसळली आहे. ज्या ठिकाणी पालक आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शिकायला पाठवतात. जिथे त्यांच्या सुरक्षेची हमी दिली जाते अशा ठिकाणीच या घटना घडल्यामुळे मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
दरम्यान,कोलकाता बलात्कार प्रकरणावर सिद्धार्थ चांदेकर, हेमांगी कवी, सई ताम्हणकर, समीर विद्वांस, जिनिलीया देशमुख, नेहा शितोळे, अनघा अतुल, अमित रेखी, हेमंत ढोमे, मंजिरी ओक, रोहित परशुराम यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच प्रीती झिंटा, समंथा रुथ प्रभू, क्रिती सेनॉन, आलिया भट्ट, हृतिक रोशन, ट्विंकल खन्ना यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.