Yek Number Movie : चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटनं हे एकत्र येऊन चित्रपट करणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार असल्याच्या चर्चांना तेव्हापासून उधाण आलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोघं एकत्र आल्यावर काय होणार याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याची झळक नुकतीच शेअर करण्यात आली आहे. तेजस्विनी पंडीतने नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे. (Yek Number Movie Poster)
सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले असून हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेने तोंड करून उभा असलेला एक तरुण दिसत असून त्याच्या जॅकेटवर ‘मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा’ असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. तसंच पँटच्या मागच्या खिशात एका मुलीचा फोटो आणि हातात बाटलीही आहे. त्याच्या मनातील धगधगणारी आग पोस्टरमधून दिसून येत आहे. प्रेमात वेडा आणि महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभा असणारा तरुण नेमका कोण आहे? त्याची गोष्ट काय असेल? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. ‘येक नंबर’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून हा चित्रपट १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी आणि बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी केले असून मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या संगीताची भुरळ घालणारे संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. तर संजय मेमाणे ‘येक नंबर’चे छायाचित्रकार आहेत.
चित्रपटाबाबतच्या इतर गोष्टी समोर आल्या असल्या तरी यात कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. तसंच पोस्टरमधील नायकाच्या जॅकेटवर लिहिलेल्या ‘मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा’ या वाक्यामुळे हा चित्रपट राज ठाकरे यांच्याशी संबंधित आहे का? हे कोडंही अनेकांना पडलं आहे. दरम्यान, तेजस्विनी पंडीतने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.