Satvya Mulichi Satavi Mulgi : छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या कथानकातही काही दिवसांपूर्वी असांचं एक मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. यावेळी नेत्राच्या हातून देवी आईने दिलेल्या शस्त्रातून विरोचकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेत्राने विरोचकाचा वध केला आहे. त्यानंतर ती तिच्या जुळ्या मुलींना सोबत घेऊन पुढचं आयुष्य जगायला सुरुवात करते. नेत्राला जाणवू आणि दिसू लागतं की जुळ्या मुलींचे स्वभाव मात्र एकमेकींविरुद्ध आहेत. जिथे ईशा देवाशी निगडीत असलेल्या गोष्टींना स्वीकारते. पण रिमाला मात्र देवांच्या संदर्भातील एकही गोष्ट आवडत नाही. (Satvya Mulichi Satavi Mulgi serial update)
अशीच काहीशी गोष्ट कोलकातामधे घडते. जिथे एका उत्खननात शतग्रीव नामक असूराचा शिलालेख सापडतो. त्या शिलालेखाचं वाचन करताच एक शक्ती जागी होते आणि ती शक्ती पश्चिम बंगालच्या दिशेने प्रवास करताना दिसते. डॉ. मैथिली सेनगुप्ता म्हणून एका डॉक्टरच्या कानात ती किडारुपी शक्ती शिरते. मैथिली सेनगुप्ताचं वागणं बदलून जातं आणि एकाक्षणी मैथिलीमधे शिरलेली शक्ती रूप घेते आणि नवा राक्षस जागा होतो. एक साधी सरळ स्वभावाची मैथीली सेनगुप्ता शतग्रीव बनते आणि तिच्या सासूचा खून करत महाराष्ट्रच्या दिशेने निघते. याच कथानकाचा धागा धरत मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये मैथिली सेनगुप्ता नामक शतग्रीव नेत्राच्या बाळाला घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये शतग्रीव राक्षस नेत्राच्या बाळाला घेऊन जात असतो. तेवढ्यात इंद्राणी, शेखरसह सर्वच जण तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण शतग्रीव सर्वांना हुसकावत पुढे जाते. इतक्यात नेत्रा येते आणि ती विरोचक असं ओरडते. त्यावर शतग्रीवही रागाने बघते.

त्यामुळे मैथिली सेनगुप्ता आणि नेत्राच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय?, ती नेत्राच्या बाळाला घेऊन जाणार आहे का? शतग्रीवच्या येण्याने पुन्हा राजाध्यक्षांवर काही नवीन संकट येणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. दरम्यान, या नवीन कथानकावर मात्र प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. “काहीही दाखवतात”, “फालतू मालिका”, “काहीतरी सकारात्मकता दाखवा”, “काय बावळटपणा… देवापेक्षा मोठं कोणीही नाही. रक्ताने देवीला अभिषेक झाला, देवी बाळांना आशीर्वाद देते तरीही एक बाळ राक्षस. काय बालिशपणा…” अशा अनेक कमेंट्स करत या प्रोमोला नापसंती दर्शवली आहे.