‘कॉफी विथ करण सीझन ८’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आजवर बरेच बॉलिवूड कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसले. दरम्यान यावेळी कलाकारांनी सांगितलेले अनेक किस्से चर्चेत आले. अशातच आता आणखी एका सेलिब्रिटीमुळे या कार्यक्रमाचा आगामी भाग अधिक चर्चेत येणार आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखला जाणारा ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरी याने नुकतीच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (Koffee With Karan Season 8)
सोशल मीडियावरुन कलाकारांसह फोटो शेअर करणारा ओरी कायमच चर्चेत राहिला. ओरीने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच लव्ह लाइफबाबतही मोठा खुलासा केलेला पाहायला मिळाला. फिनाले एपिसोडच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये करणने ओरीला विचारले आहे की, ‘तो सिंगल आहे का?’, करणने विचारलेल्या या प्रश्नावर ओरीने दिलेल्या उत्तरावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ओरी म्हणाला, “आपल्याला आयुष्यात एकदाच तारुण्य मिळते. त्यामुळे मी एकाच वेळी ५ जणांना डेट करत आहे. कारण एकाला डेट करण्यात इतकी गंमत आहे की ती पाच जणांना डेट करताना आणखी वाढेल. मात्र हे पाचही जण एकमेकांना ओळखत नाहीत. त्यांच्यात भांडण व्हावं असं मला वाटत नाही. मला लग्न करायचे नाही कारण तुम्ही लग्न केल्यावर कोणाची फसवणूक करु शकत नाही. पण मी सध्या फसवणूक करत आहे” असं तो म्हणाला.
ओरी या शोमध्ये आला तेव्हा तो असंही म्हणाला की, “माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझ्यासारखाच विचार करण्यास सांगितले आहे. एवढंच नाही, तर त्यांना माझ्यासारखेच राहायला आणि माझ्यासारखाच ड्रेस घालावा लागतो. मी माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वत: नाव दिले आहे. त्यांना ओरी नंबर १, ओरी नंबर २ अशी हाक मारली जाते. माझ्याकडे एकूण सहा लोक आहेत जे मला सतत चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या सुचवत असतात” असंही तो म्हणाला.