Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फिनाले जवळ येत आहे. दरम्यान स्पर्धकांचा खेळ हा रंजक झालेला पाहायला मिळत आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यात अनेक वाद-विवाद होताना पाहायला मिळाले. अशातच आता अंकिता लोखंडेची आई वंदना लोखंडे यांनी विकी जैनच्या आईबद्दल खुलासा केला आहे. फॅमिली वीक दरम्यान, विकी जैनच्या आईने अंकिताला सांगितले होते की, अंकिताने विकीला लाथ मारल्यानंतर तिच्या सासऱ्यांनी आईला फोन केला होता आणि विचारले होते की, “ती सुद्धा तिच्या पतीबरोबर असेच वागते का?” यावर आता अभिनेत्रीच्या आईने भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे.
अंकिता लोखंडेच्या आईने ‘गलाटा इंडिया’सह बोलताना सांगितले की, “ही घटना आणि विकीच्या आईने केलेली कमेंट चुकीची आहे. असं व्हायला नको होतं”. वंदना लोखंडे म्हणाल्या, “अंकिता व विकी दोघेही अनेक महिन्यांपासून त्यांच्या पालकांपासून दूर आहेत. शोमध्ये असं व्हायला नको होतं. विकीला हे संभाषण झाले आहे याची जाणीवही नाही आणि त्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम होऊ नये असं मला वाटतं”.
अंकिताची आई पुढे म्हणाली की, “अंकिता रडत होती आणि काळजीत होती. मी तिला या सर्व प्रकाराबद्दल काहीच सांगितले नाही, परंतु ती स्वतः म्हणाली की, तिला आधीच हे सर्व माहित आहे”. जेव्हा मी तो प्रोमो पाहिला तेव्हा मला खूप वाईट वाटले. मला माहित आहे की अंकिताला तिच्या वडिलांची आठवण येत आहे.
याचबरोबर अंकिता लोखंडेच्या आईला विकी जैनच्या आईने प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या भाष्याबाबत विचारले असता त्यांनी विकीच्या आईला मत मांडण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. याशिवाय अंकिताची आई वंदना लोखंडे यांना एका मुलाखतीदरम्यान विकीने अंकितावर हात उचलल्याच्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले असता, त्या असं म्हणाल्या की, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी विकीलाही ओळखते. तो माझ्याबरोबर राहतो. मी त्याला चांगलं ओळखते. हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे काही घडले नव्हते. कारण ते एकमेकांवर खूप प्रेम करणारे जोडपं आहे.”