‘बिग बॉस मराठी’ हे नवं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. यंदाच्या पर्वाने साऱ्या रील स्टारला खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सध्या सोशल मीडियाचं वाढत प्रमाण पाहून अनेकजण याचा फायदा करुन घेत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना ‘बिग बॉस’मराठीच्या घरात संधी मिळाली आहे. यंदा कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण हे रील स्टार धुमाकूळ घालताना दिसत आहेत. (Suraj Chavan Bigg boss marathi journey)
यंदाच्या पर्वात रील स्टार सूरज चव्हाण स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेल्या सूरज चव्हाणने टिक टॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवरील रील्सवर आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला. ‘गुलिकत धोका’ असे खास आपल्या शैलीत बोलणारा सूरज हा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. विनोदी धाटणीच्या व्हिडीओने सूरजच्या रील्सला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर सूरजचे कुटुंबीय अगदी भारावून गेले होते. याचबाबत तो म्हणाला, “घरातील सगळेच खूप खुश झाले. खूप कल्ला कर असं त्यांनी मला सांगितलं. आमची मतं तुलाच असणार आहेत. तूच जिंकणार, ट्रॉफी घेऊन तूच येणार असंही त्यांनी मला सांगितलं. कोणी नडलं तर तिथेच गुलीगत फोड असाही सल्ला मला दिला”.
सूरजने घरात प्रवेश करण्यापूर्वी कोणा कोणाला कॉल केला? याबाबतही सांगितलं. तो म्हणाला, “बहिणींना मी कॉल केला होता. माझ्या चार बहिणी आहेत त्या रडल्या. मला बोलल्या तू काळजी घे. कोणी तुला नावं ठेवणार नाही असं त्या घरात राहा असंही मला सांगितलं”. सुरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर सूरजचा त्याच्या बहिणींनी सांभाळ केला. शिक्षण घेता घेता मोलमजुरी करत करत त्याने घरची परिस्थिती सांभाळली. मात्र करोना काळातील त्याच्या व्हिडीओने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.