जगातील नामांकित ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे सह-संस्थापक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतीय संस्कृतीबद्दल अधिक आकर्षण असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका चहावाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. पण या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील ‘चहावाला नक्की कोण आहे?’ आणि ‘तो दिवसाला किती कमाई करतो?’, याबद्दल माहिती जाणून घेऊया. (Dolly chaiwala income)
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जो चहावाला आहे तो नागपूरमधील एक प्रसिद्ध ‘डॉली चहावाला’ आहे. त्याचे खरे नाव सुनील पाटील असून त्याचा जन्म 1998 मध्ये नागपूर येथे झाला. तो गेल्या 15 ते 20 वर्षापासून चहा विक्रीचे काम करतो. चहा बनवण्याच्या हटक्या शैलीमुळे तो सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध झाला.त्याचे इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
‘डॉली चहावाल्या’ने म्हणजे सुनीलने 10वी नंतर शिक्षण सोडले. त्यानंतर त्याने उदरनिर्वाहासाठी नागपूरमधील सिव्हिल लाईन्सजवळ चहाचे दुकान सुरू केले.त्याच्या दुकानांवर जो चहा पिण्यासाठी जातो तो त्याच्या चहाचा व चहा बनवण्याच्या शैलीचा चाहता होतो. दिवसाला तो जवळपास ३५० ते ४०० कप चहाची विक्री करतो. एक कप चहा ७ रुपये म्हणजेच दिवसाला तो २५०० ते ३५०० रुपयांची कमाई करतो. त्याचे वर्षाचे उत्पन्न १० लाख रुपयांपर्यंत आहे.
नुकताच त्याचा व बिल गेट्स यांचा एकत्रित व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये तो बिल गेट्स यांना आपल्या खास शैलीमध्ये चहा बनवून देत आहे. त्याच्या या शैलीवर स्वतः बिल गेट्स त्याचे चाहते झाले आहेत. पण आपण नक्की चहा कोणाला बनवून दिला याची माहिती नसल्याचे डॉली चहावाल्याने सांगितले असून भविष्यात त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा बनवून द्यायचा आहे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.