रंगभूमीतील ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना आज कोण नाही ओळखत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी नाटक, चित्रपट, छोटा पडदा व ओटीटी या सर्वच माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलेलं असलं. तरी ते रंगभूमीतच जास्त रमले. प्रशांत यांनी तब्बल ३२ नाटकांचे सुमारे १२ हजारांहून अधिक विक्रमी प्रयोग केले, जो एक मोठा विक्रम आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी गायक, दिग्दर्शक व निर्माते या भूमिका देखील उत्तमरीत्या पार पाडल्या आहे. त्यांच्या या रंगभूमीतील योगदानाबद्दल नुकतंच त्यांना मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीतील प्रतिष्ठित असा विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Kiran Mane congratulates Prashant Damle via facebook post)
प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी यानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत प्रशांत यांचे कौतुक केले. किरण व प्रशांत यांनी वंदना गुप्तेंसह ‘श्री तशी सौ’ हे नाटक केलं होतं. त्या नाटकाचा एक जुना फोटो शेअर करत प्रशांत यांच्याबरोबरची एक आठवण सांगितली. ते या पोस्टमध्ये म्हणाले, “हल्ली मराठीत काही वाहिन्यांनी जाहिरात चमकदार करण्याच्या नादात ‘सुपरस्टार’, ‘महानायक’ असे शब्द लईच स्वस्त करून टाकले. उठसूठ कुणाही आठ-दहा चित्रपटांत किंवा नाटकात दिसलेल्या नटाला ‘सुपरस्टार’ हे पद बिनधास्त चिकटवून देतात. दहा फ्लाॅप आणि साता-नवसातून एखादा हिट देणार्यालाही ‘महाराष्ट्राचा महानायक’वगैरे टॅग लावून देतात. त्यामुळे आजकाल हा शब्द लईच गुळगुळीत झाला. त्या शब्दाचं महत्वच कमी झालं.”
“पण खरंच, खरा ‘सुपरस्टार’ कोण असतो? चित्रपट किंवा नाटक चांगलं असेल तर चालतंच. पण ज्या नटावरच्या केवळ प्रेमासाठी प्रेक्षक त्याचा वाईट सिनेमा किंवा वाईट नाटकही आवर्जून चित्रपट/नाट्यगृहांपर्यंत जाऊन पाहतात. अमिताभचे कित्येक भंगार सिनेमेही किंवा काशिनाथ घाणेकरांची वाईट नाटकंही लोकांनी गर्दी करून पाहिली. शाहरूख खानचा ‘पठाण’ हा वाईट चित्रपटही सुप्परडुप्पर हिट झाला. हे खरे सुपरस्टार! आजच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत असा एकही अभिनेता नाही, ज्याच्यावरील लोक केवळ प्रेमापोटी त्याचा ‘वाईट चित्रपट’ही चित्रपटगृहांपर्यंत जाऊन, तिकीट काढून पाहतात. कुणीही नाही! त्यामुळे मराठी चित्रपटाला अशोकमामा-लक्ष्यामामा हे शेवटचे सुपरस्टार लाभले असं म्हणता येईल.”, असं ते या पोस्टमध्ये म्हणाले.
हे देखील वाचा – Video : …अन् नाशिकमध्ये आजीबाईंनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे व चेतना भटचे धुतले पाय, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
पुढे प्रशांत दामलेंचं कौतुक करताना ते म्हणतात, “पण नाटकात मात्र आजही असा सुपरस्टार आहे. ज्याचं कुठलंही नाटक लागलं की, फक्त त्याच्या नांवावर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागतोच! जरी ते नाटक चांगलं असो वा वाईट, कमीत कमी अडीचशे ते तीनशे प्रयोग ते करतात! त्याचं नांव वन ॲन्ड ओन्ली प्रशांत दामले. बारा वर्षांपूर्वी मी स्वतः त्याच्यासोबत ‘श्री तशी सौ’ हे नाटक केलं. नाटकात मी ‘श्री’ आणि वंदना गुप्ते ‘सौ’, तर प्रशांत दामले सुत्रधाराच्या भूमिकेत होता. मला त्यावेळी दामलेची लोकप्रियता ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळाली. उभा-आडवा महाराष्ट्रच नव्हे तर इंग्लंड-स्काॅटलंड मधले दौरेही हाऊसफुल्ल झालेले अनुभवले. विशेष म्हणजे, त्याची ती लोकप्रियता आमच्या नाटकाच्या दहा वर्ष आधीही होती, आणि आजही टिकून आहे!”
हे देखील वाचा – “अचानक एका बाईंनी मागून अथांगला पकडलं अन्…”, उर्मिला निंबाळकरने सांगितला लेकाबरोबर घडलेला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “इच्छेविरुद्ध ओढून त्याचे…”
“मराठी व्यावसायिक नाटकाच्या या सुपरस्टारला काल मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘विष्णूदास भावे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. ‘नाटक’ या कला प्रकाराला पूर्णवेळ वाहून घेतलेल्या अस्सल नाटकवाल्याला हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. सलाम दामलेज्. लब्यू”, असं किरण या पोस्टमध्ये म्हणाले. त्यांच्या या पोस्टवर प्रशांत दामले यांनी किरण यांचे आभार मानले.