हिंदी व मराठी मालिकांमधून अभिनयाची छाप सोडत आजवर छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने स्वतःच नाव स्वमेहनतीने कमावलं आहे. ‘दुहेरी’ या मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि ‘दिया और बाती’, ‘मेरी आशिकी तुमसे’ या हिंदी मालिकेतून उर्मिलाने तिच्या अभिनयाची जादू दाखवली. सध्या उर्मिला अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी ती तिच्या युट्युबच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Urmila Nimbalkar Post)
सोशल मीडियावरून ती नेहमीच आशयघन विषय शेअर करत असते. तसेच ती तिचा मुलगा अथांग आणि नवरा सुकीर्त गुमास्तेचे अनेक फोटो, व्हिडीओ देखील सोशल मीडियावरून शेअर करत असते. उर्मिला तिच्या लेकाबरोबरचे अनेक अनुभव ही सोशल मीडियावरून शेअर करत असते. अशातच उर्मिलाने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत तिच्या लेकाबरोबर बाहेर फिरताना तिला अनोळखी व्यक्तीचा आलेला अनुभव तिने शेअर केला आहे.
इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत उर्मिला म्हणाली की, “एक कळकळीची विनंती. मी आज संध्याकाळी सुकीर्त व अथांग यांच्यासह बाहेर गेले होते. रस्त्यावर आकाशकंदील खरेदी करताना, मागून अचानक एक बाई आल्या आणि त्यांनी अथांगला मागून पकडले आणि जोरात त्याचे गाल ओढले. त्याने तो खूपच घाबरला आणि रडायला लागला. ही बाळांमधील या वयातील अतिशय नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, त्याला ‘Stranger Danger’ असे वैज्ञानिक नावही आहे.”
उर्मिला पुढे सांगते, “अथांगला व्हिडीओमध्ये पाहून त्याच्याविषयी प्रेमाची भावना असणे हे अगदी बरोबर आहे, पण २५ महिन्याच्या बाळाला त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून त्याचे फोटो काढणे, तो रडत असतानाही त्याला ओढून स्वतःच्या जवळ खेचणे, बाहेरील अस्वच्छ हाताने बाळाला पकडणे, तो हात लावू देत नाही म्हणून पाठमोरे होऊन त्याला नावं ठेवत जाणे हे अयोग्य आहे. आणि अथांगसाठी असुरक्षितही. विचारल्यानंतर फोटोचं काय तर घरी जेवायला सुद्धा येऊ आम्ही, परंतू आपल्या या अट्टाहासात बाळाचे हाल करणे मला पटत नाही.” असं म्हणत लेकाबाबत काळजी व्यक्त केली आहे.