‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. आजवर कार्तिकीने तिच्या सुमधुर आवाजाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांच्या या लाडक्या कार्तिकीने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर करत साऱ्यांना सुखद धक्का दिला. कार्तिकीने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. २०२० साली कार्तिकीने रोनित पिसेसह लग्नगाठ बांधली. लग्नाच्या चार वर्षांनी दोघांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली. (Baby Shower Scientific Reason)
कार्तिकीने ही गुडन्यूज थेट तिच्या शाही डोहाळ जेवणाचे फोटो शेअर करत दिली. कार्तिकीच्या राजेशाही डोहाळ जेवणाचा थाटमाट साऱ्यांच्या पसंतीस पडला. यावेळी कार्तिकीचा पारंपरिक अंदाज आणि लूक खूप खास दिसत होता. प्रथेप्रमाणे डोहाळ जेवणानंतर माहेरी आली. पण महिलेचं हे डोहाळ जेवण स्त्रीच्या गरोदरपणात सातव्या महिन्यात का केले जाते? हा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. अगदी पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत गरोदरपणात योग्य काळजी घेऊन बाळाला जन्म देणे हा प्रत्येक महिलेसाठी एक वेगळा प्रवास आहे. या प्रवासात गरोदर असणाऱ्या महिलेची काळजी घेण्यासह तिच्या आनंदाचा सोहळाही केला जातो आणि हा सोहळा म्हणजे डोहाळे जेवण.
डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय?, तर महिलेच्या गर्भात साधारण पाचव्या महिन्यात बाळाची स्पंदने जाणवू लागतात. बाळाच्या इच्छेनुसार आईला खावेसे वाटते. त्याला डोहाळे लागणे असे म्हटले जाते. साधारण सातव्या महिन्यात बाळाची वाढ ही पूर्ण झालेली असते आणि त्यादरम्यान बाळाला अधिक अन्नपुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळेच महिलेसाठी डोहाळे जेवण हा सोहळा आयोजित करण्यात येतो आणि बाळाचे लाड अर्थात महिलेचे डोहाळे यावेळी पुरविण्यात येतात.
डोहाळे जेवण करण्याचं वैज्ञानिक कारणही आहे. डोहाळ जेवणाचा कालावधी हा विशेषतः सातव्या महिन्यात असतो. यानंतर प्रत्येक महिलेला संपूर्ण विश्रांतीची गरज असते. पूर्वी महिलांना आराम मिळत नसे. त्यामुळे सातव्या महिन्यात त्यांना माहेरी पाठविण्याची प्रथा होती. आताही ही प्रथा बऱ्याच ठिकाणी पाळली जाते. तसेच पूर्वी महिलांना हवे तितके खायला मिळत नसे. त्यामुळे त्यांचे डोहाळे पुरविण्याचा हा दिवस साजरा करत ही प्रथा पार पाडली जायची. काही ठिकाणी बाळाच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये म्हणून विशेष पूजाअर्चाही केली जाते. या विधीनंतर गर्भवती महिलेला आपल्या माहेरी पाठवण्यात येते जेणेकरुन तिच्या शरीराला विश्रांती मिळून आई व बाळ या दोघांचेही आरोग्य उत्तम राहील.