‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून बरेच गायक प्रसिद्धीच्या झोतात आले. या रिऍलिटी शोमधून गायिका कार्तिकी गायकवाडला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. कार्तिकीला तिच्या घरातूनच संगीताचे धडे मिळाले. आजवर अनेक गाण्यांना कार्तिकीने आवाज दिला आहे. ती कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. विविध कार्यक्रम व चित्रपटांमध्ये गायलेल्या गाण्यांनी संगीतप्रेमींचं मनोरंजन तिने केलं आहे. ती जितकी तिच्या कामामुळे चर्चेत राहते, तितकीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. (Kartiki Gaikwad On Husband)
कार्तिकीने डिसेंबर २०२० साली व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली आणि सगळ्यांना सुखद धक्काच दिला. कार्तिकी व रोनित यांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर कार्तिकी व रोनित थायलंडलाही गेले होते. त्यांच्या थायलंड ट्रीपचीही चर्चा सर्वत्र रंगली होती. रोनित तसेच कार्तिकी एकमेकांबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. लग्नानंतर कार्तिकीचा संसार सुरळीत सुरु असून तिच्या परदेश वारीची, तसेच पतीबरोबरच्या फोटोशूटची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते.
अशातच कार्तिकीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. कार्तिकीने ही स्टोरी तिच्या नवऱ्याच्या कौतुकास्पद शेअर केली आहे. “entrepreneurs today या इंटरनॅशनल मॅगझीनच्या कव्हर पेजवर तुझा फोटो पाहून खूप आनंद झाला आहे. मनापासून अभिनंदन. तुझी अशीच प्रगती होत राहो, मी कायम तुझ्याबरोबर आहे”, असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या नवऱ्याचं अभिनंदन केलं आहे. कार्तिकीच्या नवऱ्याचा आंतरराष्ट्रीय मॅगझीनवर आलेला फोटो पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
कार्तिकी गायकवाडचा नवरा रोनित पिसे हा पेशाने व्यावसायिक आहे. तो पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादकही आहे. तर कार्तिकीचे कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील व गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.