Rishab Shetty Movie : साऊथ चित्रपट कांताराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. कांतारा या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केलेली पाहायला मिळाली. या चित्रपटातून अभिनेता ऋषभ शेट्टीने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कांतारा चित्रपटातून सर्वांची मने जिंकणारा ऋषभ शेट्टी आता पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऋषभने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने त्याचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे.
ऋषभ शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. ज्यानंतर तो खूप उत्साहित झाला आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ऋषभने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “भारताचा महान योद्धा राजा – भारताचा अभिमान: छत्रपती शिवाजी महाराज यांची महाकथा सादर करण्यासाठी आमचा सन्मान आणि विशेषाधिकार. हा केवळ एक चित्रपट नाही तो एका योद्धाच्या सन्मानार्थ एक लढाईचा आक्रोश आहे ज्याने सर्व अडचणींविरुद्ध लढा दिला, बलाढ्य मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान दिले आणि कधीही न विसरता येणारा वारसा निर्माण केला”.
हा चित्रपट २७ जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सिंग करत आहेत. संदीपने मेरी कॉम, सरबजीत, वीर सावरकर, रामलीला, सरबजीत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटातून आता तो ऋषभ शेट्टीबरोबर काम करणार आहे. ऋषभही या भूमिकेत जीव ओतून काम करायला सज्ज झाला आहे. या चित्रपटात चाहत्यांना जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे.
कांतारा नंतर ऋषभ शेट्टीची लोकप्रियता अचानक वाढली आहे. आता तो ‘कांतारा’चा सिक्वेल ‘कांतारा चॅप्टर 1’ घेऊन येत आहे. हा चित्रपट ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर २०२६ मध्ये ऋषभचा ‘जय हनुमान’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यानंतर २०२७ साली छत्रपती शिवाजी महाराज हा चित्रपट येणार आहे. येत्या तीन वर्षांत ऋषभची चित्रपटांमधून जादू पाहायला मिळणार आहे.