अभिनेत्री काजोल कायमच तिच्या कामामुळे चर्चेत असते. अशातच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काजोलने मुंबईत ऑफिससाठी मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. यापूर्वीही तिने १२ कोटींचे दोन अपार्टमेंट्स खरेदी केले होते. तसेच तिचा पती अजय देवगणनेही एकूण पाच अपार्टमेंट खरेदी केले होते. (Kajol New Property Price)
कागदपत्रांनुसार, रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) च्या नियमांनुसार, काजोलच्या नवीन ऑफिसची जागा १९४.६७ चौ. मीटरमध्ये पसरलेली आहे. काजोलचे नवीन कार्यालय अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडशेजारी ओशिवरा परिसरात आहे. बहुतेक बॉलीवूड कलाकारांची व चित्रपट निर्मात्यांची कार्यालये या भागात आहेत.
समोर आलेल्या अहवालानुसार, काजोलने २८ जुलै रोजी वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून तिने मालमत्ता विकत घेतली. काजोल व अभिनेता अजय देवगण दोघेही जास्तीत जास्त शहरातील मालमत्तेत गुंतवणूक करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, अजयने १३,२९३ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या पाच ऑफिस युनिट्स खरेदी केल्या होत्या, तर काजोलने एक भव्य अपार्टमेंट खरेदी केले होते.
या वर्षी अजयच्या मालमत्ता पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. तीन कार्यालयांची किंमत ३०.३५ कोटी रुपये आहे आणि इतर दोन कार्यालयांची किंमत १४.७४ कोटी रुपये आहे. अंधेरीमध्ये ऑफिसची जागा खरेदी करण्यापूर्वी काजोलने २,४९३ चौरस फूटमध्ये पसरलेला १६.५ कोटी रुपयांचा भव्य फ्लॅट खरेदी केला होता.
काजोल वेब शो ‘द ट्रायल’मध्ये झळकली होती. ती पुढे नेटफ्लिक्सच्या ‘दो पट्टी’मध्ये कृती सेनन व तन्वी आझमीसोबत दिसणार आहे. दुसरीकडे अजय शेवटचा त्याच्या दिग्दर्शन भोलामध्ये दिसला होता. बोनी कपूर निर्मित अमित शर्माचा मैदान हा त्याचा पुढचा चित्रपट आहे.