Park Min Jae Passed Away : दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता पार्क मिन जे आता आपल्यात नाही. अनेक हिट शोमध्ये दिसलेल्या या अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. २ डिसेंबर २०२४ रोजी, त्यांच्या एजन्सी बिग टायटलने पार्कच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केली. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करत आहे. पार्कने अगदी लहान वयातच अभिनयाच्या जगात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करताना बिग टायटल एजन्सीने लिहिले की, ‘पार्क मिन जे, ज्यांना अभिनयाबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी होती आणि त्यांनी नेहमीच सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. आता तो आम्हा सर्वांना सोडून गेला आहे’.
या पोस्टद्वारे त्यांनी पुढे म्हटलं की, “तुम्ही सर्वांनी आम्हाला दाखवलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. आपण त्याला यापुढे अभिनय करताना दिसणार नसला तरी एक मोठा अभिनेता म्हणून आपण त्याला नेहमीच अभिमानाने स्मरणात ठेवू. त्याच्या आत्म्याला शांती लाभो”. पार्क मिन फक्त ३२ वर्षांचा होता. अशा परिस्थितीत त्यांच्या आकस्मिक निधनाचे कारण काय असावे, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्याच्या एजन्सीने पोस्टमध्ये खुलासा केला की, अभिनेताचा मृत्यू चीनमध्ये २९ नोव्हेंबर २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याचे अंत्यसंस्कार ४ डिसेंबर रोजी सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहेत आणि तेथे त्यांच्यासाठी शोक सभादेखील आयोजित केली जाईल. त्याच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी हा खूप कठीण काळ आहे. या कठीण काळात पार्कच्या चाहत्यांपासून त्याच्या जवळच्या मित्रांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्याच्या धाकट्या भावाने लिहिले की, “माझा प्रिय भाऊ आता आरामात गेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी माझ्या भावाची आठवण ठेवावी अशी माझी इच्छा आहे. कृपया समजून घ्या की मी प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संपर्क करु शकत नाही”.
दरम्यान, बिग टायटलचे सीईओ ह्वांग जू ही यांनी देखील सोशल मीडियावर अभिनेत्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले की, “चीन नंतर महिनाभराच्या सहलीला जाणार म्हणणारा मुलगा आता खूप लांबच्या प्रवासाला निघाला आहे. हे सर्व अचानक घडले आणि खूप धक्कादायक होते. त्याच्या कुटुंबावर हा दु:खाचा काळ आहे”.