अभिनेते ज्युनिअर महमूद यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गुरुवारी मध्यरात्री २च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजपर्यंत पसरला होता आणि त्यामुळे त्यांचं वजनही सतत कमी होत होतं. मात्र हा लढा ते फार काळ लढू शकले नाहीत. शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत. (Junior Mehmood funeral)
दरम्यान, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. जॉनी लिव्हर, राकेश बेदी, सुदेश भोसले, आदित्य पांचोली, अवतार गिल, रझा मुराद यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शुक्रवारी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद यांच्या राहत्या घरी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याशी झुंज देत ज्युनियर महमूद यांचं निधन झालं. जॉनी लिव्हर यांनी ज्युनियर मेहमूदच्या घरी त्यांची मुलं जेमी लिव्हर व जेसी लिव्हर यांच्यासह हजेरी लावली. दरम्यान त्यांनी दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबियांसह फोटोही क्लिक केले.
जॉनी लिव्हर यांनी अभिनेत्याच्या कुटुंबासह फोटो क्लिक केल्याने सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी ट्रोल करत, “त्या व्यक्तीचं निधन झालं आहे, आणि हे लोक फोटोशूट करत आहेत, हद्द झाली” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने कमेंट करत, “यांचं फोटोशूट केव्हा बंद होणार” अशी कमेंट केली आहे. दरम्यान ज्युनिअर महमूद यांच्या आजाराचं वृत्त समोर येताच अभिनेता जॉनी लिवर यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली होती.
ज्युनिअर महमूद हे ‘दो और दो पांच’, ‘ब्रह्मचारी’, ‘मेरा नाम जोकर’, ‘परवरिश’, ‘कटी पतंग’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध भाषांमधील २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.