Itsmajja Maitricha Saatbara Series : माणसाला जन्मत:च अनेक नाती लाभतात. ज्यांची आपण निवड करू शकत नाही. पण या सगळ्यात असं एक नातं आहे, ज्याची निवड आपण स्वत: करतो आणि हे नातं म्हणजे मैत्रीचं नातं. जगात एकही मित्र नसणारा माणूस सापडणं तसं दुर्मिळच. मैत्रीचं नातं प्रत्येकासाठी खास असतं. अशाच मैत्रीच्या सुंदर नात्यावर भाष्य करणारी एक सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या सीरिजचं नाव आहे ‘मैत्रीचा सातबारा’. जसं शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सातबारा ग्राह्य धरला जातो, तसंच मैत्रीच्या हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून ही सीरिज ओळखली जाईल. (Itsmajja Maitricha Saatbara Series)
गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि या हमीपूर्ततेसाठी ‘इट्स मज्जा’ कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि नवनवीन कलाकृती घेऊन येत असतात. गेल्या वर्षभरात ‘इट्स मज्जा’ने ‘आठवी-अ’, ‘पाऊस’, नंतर ‘दहावी-अ’ अशा दर्जेदार सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. या सीरिजना प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी ‘इट्स मज्जा’ जिवलग मित्रांवर आधारित ‘मैत्रीचा सातबारा’ ही नवीकोरी सीरिज घेऊन येत आहे.
‘इट्स मज्जा’च्या आगामी ‘मैत्रीचा सातबारा’ या सीरिजमधून प्रेक्षकांना सहा मित्रांच्या आयुष्याशी संबंधित कथा अनुभवता येणार आहे. आदित्य, दौलत, छाया, सिद्धार्थ, संचिता आणि योगिता अशा सहा जिवलगांच्या जीवनावर आधारित ही सीरिज आहे. ‘मैत्रीचा सातबारा’मधून तेजस कुलकर्णी, अभिजीत पवार, आर्या, ऋषिका कदम, अजय इंगावले आणि प्रियंका गांधी हे नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
दरम्यान, ‘मैत्रीचा सातबारा’चे दिग्दर्शन अजय पवार यांनी केलं आहे असून निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. कथा-पटकथा शुभम पाठक यांची असून संवाद ऋषिकेश डी. वाय. पवार यांचे आहेत. तर काही मोजक्या एपिसोडचे संवाद कल्पेश जगताप यांनी लिहिले आहेत. येत्या २६ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता ‘मैत्रीचा सातबारा’ ही नवीकोरी सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. त्यामुळे मैत्रीचं भावविश्व अनुभवण्यासाठी नक्की बघा ‘मैत्रीचा सातबारा’.