मनोरंजन सृष्टीतील आवडत्या कलाकारांचे त्यांच्या चाहत्यांकडून अनेकदा अनुकरण होते. ‘तेरे नाम’ चित्रपटानंतर अनेकांनी सलमान खानच्या केसांची स्टाइलचे अनुकरण केले होते. मात्र या स्टाइलचे अनुकरण करण्याबरोबरच अनेकजण आपल्या आवडत्या कलाकारांकडून चांगल्या गोष्टीचे अनुकरणही करतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे इंदु.
कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच इंद्रायणी ही नवीन मालिका सुरु झाली असून या मालिकेत एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी इंदूची कथा पाहायला मिळत आहे. वयाने लहान असलेली इंदू तिच्या प्रश्नांनी मोठ्यांना अचंबित करते. त्यामुळे तिची ही भूमिका मोठ्यांसह लहानांच्याही पसंतीस उतरत आहे. त्यामुळे घराघरांत इंदूचे अनुकरणही केलं जात आहे.
या मालिकेतील संदीप पाठक यांच्या मुलीने लाडक्या इंदूचे अनुकरण केले असून तिच्यामुळे संदीप पाठक यांची लेक तिच्या घरात भांडी घासत आहे. याबद्दलचा खास व्हिडीओ संदीप पाठक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संदीप त्यांच्या मुलीला “ए स्वरा तू का भांडी घासत आहेस?” असं विचारतात. यावर त्यांची लेक “इंदू घासते म्हणून” असं म्हणते.
यापुढे संदीप आपल्या लेकीला “तुला इंदू आवडते का?” असं विचारतात. यावर त्यांची लेकही “हो” म्हणत उत्तर देते. आपल्या लेकीचा हा गोड व्हिडीओ शेअर करत संदीप यांनी “माझी स्वरा ‘इंद्रायणी’ मालिकेची आणि इंदूची फॅन झाली” असंही म्हटलं आहे.
दरम्यान, या व्हिडीओला संदीप पाठक यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांनीही संदीप पाठक यांच्या लेकीचे कौतुक केले आहे. “किती गोड”, “किती निरागस”, “खूपच छान” अशा अनेक कमेंट्स करत अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.