Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व सुरु झालं तेव्हापासून या पर्वाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. फार कमी वेळात या पर्वाने हवा केली असून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. पाचव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या भागात एकापेक्षा एक स्पर्धक असल्यामुळे प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन होत आहे. या शोमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यंदाच्या या सीझनमध्ये गायक, अभिनेता, कीर्तनकार, रॅपर, रील स्टार अशा विविध क्षेत्रातील लोकांना एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. ‘बिग बॉस’च्या या पर्वाचा तिसरा आठवडा सुरु झाला असून हे हा आठवडा स्पर्धकांनी गाजवायला सुरुवात केली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आणखी एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समोर आलेल्या या प्रोमोमध्ये सर्व स्पर्धक एकमेकांशी भांडताना, धक्काबुक्की करताना दिसत आहेत. हा भांडणाचा प्रोमो पाहून आता नेमकं आजच्या भागात काय होणार हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ यांनी दिलेल्या एका टास्क दरम्यान स्पर्धकांनी अक्षरशः हैदोस घातलेला पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, डीपी निक्कीला धरुन ठेवतो. तर ती डीपीच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करते. तर वैभव निक्कीला सोडवायचा प्रयत्न करतो, आणि “डीपी दादा तू काय करतोस”, असे डीपीला विचारतो. तर इकडे अंकिता जवळ असलेली वस्तू मिळवण्यासाठी सगळ्या मुली तिच्याभोवती उभ्या राहून तिला हेरतात. तर अरबाजवर सूरज पडतो तेव्हा अरबाज “माझा हात, माझा हात”, असं ओरडतो. तर इकडे अरबाज, वैभवला जोरात धावत येऊन धक्काही देताना दिसत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सी मिळवण्यासाठी सुरु असलेली लढाई कोणता स्पर्धक जिंकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यंदाच्या पर्वामध्ये वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, घनःश्याम दरवडे, योगिता चव्हाण, आर्या जाधव हे स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत.