Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर या दोन स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अगदी पाहिल्या दिवसापासून दोघींमध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. दोघींमधील वाद पाहून रितेश देशमुखने चांगलीच शाळाही घेतलेली पाहायला मिळाली. निक्कीने वर्षा यांचा केलेला अपमान पाहून प्रेक्षकांमधूनही नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला. त्यावरुन रितेशने निक्कीची चांगलीच कानउघडणी केली. असं असलं तरी दुसऱ्या आठवड्यातही त्यांच्यातील हा वाद काही मिटलेला दिसत नाही आहे.
कालच्या भागात असे पाहायला मिळालं की, वर्षा ताई निक्कीला म्हणतात, “हे सोफ्यावर ठेवलेलं सामान तुझंच होतं ना?, मग काल तू मी सांगितल्यावर नाही बघते असं का म्हणाली. आणि तूच स्वच्छतेबद्दल बोलत असते ना?”. यावर निक्की म्हणते, “हो पण ते काल मला आठवत नव्हतं ना?”. यावर निक्की जाऊन पुन्हा तिथे सामान ठेवते आणि सांगते, “आता तिने महिने हे सामान मी उचलणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे ते करा”. यावर वर्षा म्हणतात, “नको उचलू. मी सुद्धा माझं सामान तिथे ठेवेन”, असं म्हणत ती सामान ठेवायला जाते. तेव्हा मागून निक्की येते आणि वर्षा यांच्या बेडवरची चादर, उशी घेऊन सोफ्यावर ठेवते.
यावर वर्षा निक्कीला समज देतात की, “माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही”. तेव्हा वर्षा जाऊन निक्कीच्या बेडवरील ब्लॅंकेट आणून सोफ्यावर ठेवतात. तेव्हा निक्की वर्षा ताई यांचं पूर्ण अंथरुण बाहेर काढते. तेव्हा वर्षा ताई म्हणतात, “तू माझ्या वस्तूंना हात लावला आता मी पण लावणार”. तेव्हा वर्षा यांना निक्की अडवते. निक्की म्हणते, “माझ्या नादी लागायचं नाही”. यावर वर्षा निक्कीला म्हणते, “माझ्या पण नादी लागायचं नाही”. यावर वर्षा निक्कीला म्हणते, “तू तुझा माज इथे दाखवलास. तू किती उन्मत्त आहेस ते कळलं. रितेशजींनी तुझा माज उतरवायचा प्रयत्न केला पण ते झालं नाही”.
यावर निक्की भडकून, “तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही हे बोलत आहात ते चालतं, मी बोलले की सगळे माझ्यावर येणार. आता मी लहान आहे तुम्ही मला जे बोलत आहात ते चालतं का?. तुम्ही मला कितीही प्रवृत्त केलं तरी मी तुमचा अनादर करणार नाही”.