लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हृताने ‘दुर्वा’ व ‘फुलपाखरू’ या मालिकांमधून प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. त्यानंतर तिने मराठी नाटकांकडे आपला मोर्चा वळवला. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ सारखं नाटक केल्यानंतर तिने ‘अनन्या’, ‘टाइमपास ३’, सर्किट’सारख्या चित्रपटांद्वारे अभिनय करत परेजकक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेत्री दोन वर्षांपूर्वी निर्माता व अभिनेता प्रतीक शाहबरोबर विवाहबंधनात अडकली.
१८ मे २०२२ रोजी हृता व प्रतीक यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आणि आज त्यांच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण होताच हृताने सोशल मीडियावर त्यांचा एक रोमॅंटिक फोटो शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. “मिस्टर शाह लग्नाच्या वाढदिसानिमित्त शुभेच्छा आणि माझ्या आयुष्यात आपण असल्याबद्दल धन्यवाद” असं म्हणत तिने शुभेच्छा दिल्या आहेत.
तर प्रतीकनेदेखील लग्नाच्या वाढदिसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. हृताबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. २ वर्षे आपला वेडेपेणा, आनंद व उत्सव एकत्र साजरे केल्याचे कौतुक” तसेच यापुढे त्याने “या व्हिडीओमध्ये आम्ही आमची गेली दोन वर्षे कशी घालवली आहेत हे दाखवले आहे आणि आमची पुढची सर्व वर्षे अशीच जावीत अशी मी प्रार्थना करतो” असंही म्हटलं आहे.
या व्हिडीओवर प्रतीकची आई व हृताची सासू मुग्धा शाह यांनीही कमेंट्स करत दोघांना त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. देवाचे कायम तुमच्यावर आशीर्वाद राहो” असं म्हणत त्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या व्हिडीओला हृता व प्रतीक यांच्या चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे व दोघांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.