गेला माझा पोरगा… माझी नजर शोधते अजूनही त्याला… काय गं माझी पोरगीही अशीच मला फसवून गेली ना तीन वर्षांपूर्वी. आता हा गेला. राहिलं काय माझ्या पदरात… मध्यरात्री आम्हा नवरा-बायकोला काय झालं कोणाला हाक मारु?… काय करु गं काय करु… जोरजोरात हंबरडा फोडून रडणाऱ्या त्या आईची अवस्था पाहून माझ्या संपूर्ण अंगाला घाम फुटला. माझ्याही डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा लागल्या. मी हे सगळं बोलतेय ते माझी मैत्रीण रेखाच्या आईबद्दल… तीन वर्षांपूर्वी रेखा आजारपणात कायमची देवाघरी निघून गेली. वय होतं फक्त २५… पाठी राहिले ते तिचे आई-वडील आणि भाऊ. आता कुठे तिचं जाणं थोडंफार कुटुंबाला पचलं होतं… पण खेळ शेवटी नशिबाचा. काही दिवसांपूर्वीच रेखाचा भाऊ आजारी पडला. जवळच्या रुग्णालयात नेलं आणि अवघ्या चौथ्या दिवशीच तो घरी आला तो कायमचा झोपलेलाच… दोन्ही भावंडांचा तीन वर्षांच्या फरकामध्ये खेळ संपला आणि तेही अवघ्या विशीत… नशिबाने असा काही युटर्न घेतला की, पुन्हा ते कुटुंब शुन्यामध्ये येऊन पडलं. (womens problem)
रेखा गेल्यानंतर दोन वर्षांनी मी तिच्या घरात पाऊल ठेवलं. तिच्या आईला भेटायचं धाडस केलं. जाताना मनात हजार प्रश्न, कंठ दाटून आला, मी मोठा आवंढा गिळला… स्वतःला आधी सावरलं आणि मगच रेखाच्या घरात गेले. त्यांना भेटायला आलेली काही मंडळी आधीच घरात बसली होती. मी कसंबसं आतमध्ये गेले आणि वाट काढून उभी राहिले. तोच रेखाच्या आईने एक नजर माझ्याकडे टाकली… आणि वरती जसं मी सांगतिलं तसं तिने एकच मोठा हंबरडा फोडला. मी एकाच जागी स्तब्ध उभी होते. तोपर्यंत तिच्याजवळ आधीपासून बसलेली मंडळी आपापल्या परीने समजूत काढत होते. समजूत काढणाऱ्यांमध्ये बसलेल्या सगळ्या स्त्रियाच होत्या. बहुदा माझ्यासारखंच त्या कुटुंबाशी त्या स्त्रियांचं नातं जोडलं गेलेलं असावं…
आणखी वाचा – महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण, पण असं नक्की का घडतंय?, ‘या’ पाच लक्षणांमुळे…
१५ ते २० मिनिटं मी कधी रेखाच्या आईकडे तर कधी तिथे बसलेल्या स्त्रियांकडे बघत होते. त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होते. माझी लेक गेली तिही मंगळवारची सकाळच होती आणि आता माझा मुलगा गेला तोही मंगळवारीच… रेखाची आई भावनेच्या ओघात रडत रडत बोलून गेली… बस्स समजूत काढायला आलेल्या बायकांनी तोच विषय उचलून धरला. एक म्हणे हो ताई मंगळवार वारच खराब ना… हा दिवस उलटून गेला असता तर एकवेळ तुमचा मुलगा वाचला असता. पण काय बोलतात ना पोराचं नशिबंच खोटं… त्या बाईला कुठे थांबावं याचं भानच उरलं नव्हतं अन् फडाफडा बोलत राहिली.
एक बोलायची थांबते नाही तोपर्यंत दुसरीने तिच्या तोंडाचा पट्टा सुरु केला. अहो तो आजारी होता हे सांगायचं तरी… का लपवून ठेवलं? आम्ही आमच्या आमच्या परीने केली असती की धडपड… रेखाची आई जोरातच रडत ओरडली… अहो माझा पोर आजारीच नव्हता… साधा ताप म्हणून घेऊन गेलो हॉस्पिटलला त्यात तुम्हा सगळ्यांना कुठे त्रास आणि सांगणार… तरीही ती बाई काही बोलायची थांबेना… तरीही ओ काहीतरी झालं असतं अजून आपण चांगल्या हॉस्पिटलला नेलं असतं. वाचला असता ना ओ पोर… बिचारी रेखाची आई ते ऐकून स्वतःच्याच नशिबाला दोष देत डोक्यावर हात आपटत राहिली. बसलेल्या इतर बायकाही तिच्या बोलण्यावर मान डुलवत सहमती दर्शवत होत्या.
काही मिनिटंच तिथलं चित्र पाहिलं आणि माणसांच्या रुपात बसलेल्या राक्षसांचं मला दर्शन घडलं. दोन तरुण मुलं गमावणाऱ्या आईचं दुःख, भावना स्त्रियांनीच समजू नये छे… बाई बाईलाच जिवंतपणे मारते हे त्या प्रसंगी सिद्ध झालं. एरव्ही आम्ही किती समजूतदार म्हणत झेंडा मिरवणाऱ्या या बायकांचा शहाणपणा अशावेळी कुठे जातो?. आपल्या बोलण्यामुळे समोरच्याने स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट केलं तर? हीही विचार तुम्हाला येत नाही का?. उद्या हेच चित्र दुर्देवाने तुमच्या नशिबी घडलं तर काय होईल? या विचाराने तरी तुमचं तोंड तुम्ही शिवत का नाही?. कसलीच भीती, आपुलकी, समजूतदारपणा तुमच्यासारख्या स्त्रियांमध्ये राहिला नाही का हो?. अशा तमाम स्त्री वर्गाला एकच विनंती एकमेकींचं दुःख समजून घ्या… अन्यथा बाई बाईलाच जिवंतपणे मारते हे वेळोवेळी सिद्ध होईल आणि दुर्देवाने तुम्हालाही रेखाच्या आईसारखा अनुभव आला तर जगणं कठीण होऊन जाईल एवढंच… बघा विचार करा आणि तुम्हालाही या प्रसंगाबद्दल काय वाटतं? याविषयी कमेंटद्वारे व्यक्त व्हा… कारण आम्ही तुम्ही बोललो तर चांगला समाज घडण्यास मदत होईल इतकंच…