mandar devasthali he man baware : ‘हे मन बावरे’ ही मालिका बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांनी कलाकारांचे, दिग्दर्शकाचे पैसे थकवल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वीही अनेकदा कलाकारांनी या मुद्द्यावर सडेतोड भाष्य केलं. तर काल अभिनेते विजय पटवर्धन यांनी देखील याबाबत आवाज उठवणारी फेसबुक पोस्ट शेअर केली. आज मालिका संपूर्ण पाच वर्ष झाली असली तरी निर्मात्यांनी अजूनही कलाकार व तंत्रज्ञानाचे पैसे दिलेले नाहीत. यावर आता मालिकेचा दिग्दर्शक अमित छल्लारेने देखील आवाज उठविला आहे. त्यानेदेखील पैसे मिळाले नसल्याने पोस्ट शेअर करत लवकरात लवकर याचा निर्णय घेतला जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
अमितने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत म्हटलं की, “माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. नमस्कार. मी अमित छल्लारे. मार्च २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत मी मंदार देवस्थळी सर यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित ‘हे मन बावरे’ या मालिकेसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले. या एक वर्षात, वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पेमेंट वेळेत न मिळाल्यामुळे मला मालिका सोडावी लागली. पण अजूनही माझे ६,७०,१५१/- (सहा लाख सत्तर हजार, एकशे एकावन्न) रुपयांचे पेमेंट अडकले आहे. या पाच वर्षांत मी संयम ठेवला, अनेकदा संधी दिली, प्रत्येक वेळी समजून घेतलं, नेहमीच सपोर्ट केला, पण मला फक्त तारखा आणि आश्वासनं मिळत गेली”.
आणखी वाचा – अखेर निकाल लागला! साक्षी-प्रियाच्या हातात बेड्या, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा, अर्जुनच्या यशाने सायली आनंदी
पुढे त्याने लिहिलं आहे की, “मंदार देवस्थळी सर हे खूप सिनिअर आहेत. त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि राहील. म्हणूनच इतके दिवस गप्पं होतो पण आता त्याच गोष्टींचा विचार करुन मला खूप मानसिक त्रास होतोय आणि याआधीही झाला आहे. आता काय करायचं तुम्हीच सांगा सर. आज हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुमच्या अडचणी समजून घेतल्या पण आता माझ्याही काही अडचणी आहेत, त्या तुम्ही समजून घ्याव्या. एकदा माझ्या बाजूनेही विचार व्हावा. मला कुणालाही दोष द्यायचा नाही. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय न मिळणं माझ्यासाठी खुप त्रासदायक आहे”.
यापुढे त्याने असं म्हटलं, “आणि या सगळ्यांत माझं काय चुकलं.? मंदार देवस्थळी सर ज्या अडचणीत आहेत अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये. लवकरच ते यातून बाहेर पडो. माझ्यासारखे अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत, ते लवकर मिळो. सर, तुम्ही लवकर या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जोमाने काम करावं हिच सदिच्छा. धन्यवाद. (सर तुमच्याबद्दलचा आदर म्हणून इतके दिवस कधी बोललो नाही पण आज मला व्यक्तं व्हावंसं वाटलं . चूकभूल माफ. मला लाईक्स आणि सहानुभूती मिळावी म्हणून मी हे लिहिलं नाही. ज्यांना असा अनुभव आला आहे, त्यांना माझं म्हणणं आणि माझी अडचण कळेल)”.





