प्रत्येक माणूस स्वप्न पाहत असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. बरं ही स्वप्न कलाकार मंडळींनाही चुकली नाहीत. प्रत्येक कलाकार ही कठीण समस्यांचा सामना करून स्वप्नांच्या मागे धावत असतो. स्वप्न उराशी बाळगून सातत्याने काम करणारी ही कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनात कधीच कमी पडत नाहीत. प्रत्येकाचं एक स्वप्न सारखंच आहे ते म्हणजे स्वतःच, हक्काचं घर घेणं. प्रत्येकजण आपलं असं घर घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करत असतो. बरं घर घेतल्यानंतर त्या घराची सजावट पासून ते घराचे हफ्ते फेडेपर्यंतची धावपळ ही सुरूच असते. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने घर घ्यायला भाग पाडलेल्या एका प्रसंगाबद्दल ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Samidha Guru Struggle Story)
‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री समिधा गुरु हिच्या घराची गोष्ट पाहायला मिळाली. समिधा व अभिजीत सध्या गोरेगांव येथे राहत आहेत. या कार्यक्रमादरम्यान समिधाने त्यांच्या घराच्या अनेक आठवणी शेअर केल्या. समिधा आधी भाड्याच्या घरात राहत होती. त्यानंतर तिला स्वतःच हक्काचं घर घेण्यासाठी एका प्रसंगातून जावं लागलं. तिच्यावर ओढवलेला हा प्रसंग मनाला चटका लावणारा होता.
भाड्याचं घर ते स्वतःच घर याबाबत बोलताना समिधा म्हणाली, “आम्ही भाड्याने गोरेगावमध्ये राहत होतो. आणि मी ८ महिन्यांची गरोदर होते. त्यावेळी काही कारणास्तव आम्हाला ते घर सोडावं लागलं. आपण भाड्याच्या घरात असतो, कमावत असतो, मिळेल ते काम करत असतो असं सगळं सुरळीत सुरु होतं, पण जेव्हा घर सोडावं लागलं त्यावेळी सगळं बदललं. त्यावेळी आयुष्याला कलाटणी मिळाली. मी प्रेग्नेंट आहे, घर बदलायचं आहे, एवढं मोठं पोट घेऊन, घर शोधणं, सामान शिफ्ट करणं, हे सर्व त्यावेळी करायचं आहे”.
समिधा पुढे म्हणाली, “हा, मदतीला मित्र मैत्रिणी, कुटुंबीय होते पण तरी एक मानसिक त्रास जो होतो तो खूप झाला. आणि त्याच क्षणी अभिजित म्हणाला की, मुंबईत स्वतःच घर घ्यायचं. जिथून कुणी आपल्याला जा म्हणायला नको असं स्वतःच घर हवंच. असा हा खूप काही शिकवून जाणारा अनुभव आम्हाला दुर्वांच्या जन्माच्या वेळी आला. आणि तिच्या पायगुणांनी आम्ही तिला नव्या घरात घेऊन गेलो.”