सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातील कलाकार मंडळी आपल्या जोडीदारांबरोबर त्यांच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब व मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी काल (१४ फेब्रुवारी) रोजी व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत त्यांचा साखरपुडा पार पाडला.
अशातच आता आणखी एका हिंदी अभिनेत्यानेही ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर त्याचा साखरपुडा सोहळा पार पाडला आहे. ‘गूम है किसी के प्यार में’ फेम अभिनेता हर्षद अरोराचा गर्लफ्रेंड मुस्कान राजपूतबरोबर साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे खास फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
हर्षद अरोराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांचा साखरपुड्याचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या प्रियसीला गळ्यात पेंडंट घालताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने “आमच्या आयुष्यात आम्ही एकत्र पाऊल ताकत आहोत” असं म्हटलं आहे. हर्षदने शेअर केलेल्या या फोटोवर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींसह त्यांच्या अनेक चाहत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हर्षदची होणारी पत्नी मुस्कानसुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘नागिन’ या मालिकेमध्ये विदुषीची भूमिका साकारली होती. दरम्यान, हर्षद-मुस्कान यांचा साखरपुडा सोहळा पार पडताच अनेक चाहत्यांना त्यांच्या अनेक लग्नाची उत्सुकता लागली आहे.