मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या एका अभिनेत्याची जोरदार चर्चा होत आहे, तो अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरवने एकांकिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केला. त्यानंतर तो अनेक मालिका व चित्रपटांमध्ये दिसला. पण, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. गौरवच्या अफलातून अभिनयाचे प्रेक्षक दिवाने झाले आहे. त्यामुळे तो जिथे जातो, तिथे त्याचे चाहते त्याला भेटण्यासाठी नेहमीच आवर्जून येतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या गौरवचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (Gaurav More gave autographs to fans)
गौरव मोरे लवकरच ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचं शुटिंग सध्या सांगली येथे सुरु असून त्याला भेटण्यासाठी, त्याची एक झलक व ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्यांनी शूटिंगस्थळी मोठी गर्दी केली होती. अशातच त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग जिथे सुरु आहे, तिथल्या शाळेतील मुलं दररोज त्याला भेटण्यासाठी येत होती. अखेर त्याने शूटिंगमधून थोडा वेळ काढत त्या मुलांच्या वहीवर ऑटोग्राफ दिला. यावेळी ऑटोग्राफ देताना गौरवच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
गौरवने हा व्हिडिओ नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच, हा व्हिडिओ शेअर करताना त्याने एक पोस्टदेखील लिहिली. “महापरिनिर्वाण चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त मी सांगलीला गेलो होतो. तर जिथे मी शूट करत होतो, त्याच्या बाजूला एक शाळा होती. तेव्हा तिथल्या मुलांना समजले की, माझं शूटिंग सुरु आहे. तर ती मुलं दररोज माझा फोटो काढण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी येत होती. एक दिवस असा हा ऑटोग्राफचा खच माझ्याकडे आला, तो हा क्षण. मला एवढं प्रेम दिल्ल्याबद्दल लहान लहान बच्चूंचे खूप आभार…”, असं तो या पोस्टमध्ये म्हणाला.
हे देखील वाचा – घोडबंदर रोडवरील सततच्या ट्रॅफिकमुळे वैतागली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, म्हणाली, “अर्ध्या तासाच्या रस्त्याला…”
गौरवचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला. त्याचबरोबर, नेटकरी लाईक्स व कमेंट्सद्वारे अभिनेत्याचं कौतुक करताना दिसत आहे. एक नेटकरी यावर कमेंट करत म्हणाला, “लाईन लागेल भाऊ आटोग्राफ साठी बघा तुम्ही”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “हे आहे यश.”. त्याचबरोबर कलाकारही त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत भरभरून कौतुक करताना दिसत आहे. या महिन्यात गौरवचे ‘अंकुश’, ‘बॉईज ४’ व ‘लंडन मिसळ’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यातील ‘अंकुश’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तर ‘बॉईज ४’ आणि ‘लंडन मिसळ’ हे प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.