डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि बेरकीपणानं हुंकारत बोलणे ही ज्यांची ‘स्टाईल’ होती ते म्हणजे निळू फुले. अनेक मिमिक्रीवालेसुद्धा निळू फुलेंची एवढीच नक्कल करत असत आणि आजही करतात. प्रसंगी पदरची वाक्ये बोलतात आणि निळू फुलेंच्या नावावर खपवतात. ‘बाई वाड्यावर या…’ हे वाक्य कदाचित त्यातलेच! पण हे वाक्य म्हणजे निळू फुलेंची खरी ओळख नव्हे. खरंतर हे वाक्य निळू फुलेंनी कुठल्या चित्रपटात उच्चारलं होतं याविषयी कोणालाही माहिती नाही. पण ‘बाई वाड्यावर या…’ ही निळू फुलेंची ओळख असणे दुर्दैवी आहे. (Gargi Phule and Prasad Oak Angry on Content Creators)
सोशल मीडियावर अलीकडे कंटेट क्रिएटर्सकडून निळू फुलेंच्या ‘बाई वाड्यावर या…’ या वाक्याची सर्रास नक्कल केली जाते. मग बाकी कंटेट काहीही असो. असंच काहीसं पुण्यातील काही कंटेट क्रिएटर्सकडून करण्यात आले आहे. पुण्यातील पवन वाघूलकर व सायली पाठक यांनी निळू फुले यांच्यावर एक रील व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी निळू फुलेंच्या ‘बाई वाड्यावर या…’ या वाक्याचा वापर केला आहे. यावर निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – लक्ष्मी आली घरा! सुप्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या नऊ वर्षांनी दिली गुडन्यूज
गार्गी फुले यांनी या रीलवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “हे किती हिडीस आहे. कृपया माझ्या बाबांना असं बदनाम करु नका. सायली फाटक तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती”. तसंच यावर अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकनेही संतप्त कमेंट केली आहे. याबद्दल प्रसादने असं म्हटलं आहे की, “निळू फुले कोण होते आणि काय दर्जाचे होते हे समजायला यांना १००००० जन्म घ्यावे लागतील. गार्गी फुले सोडून दे. ‘निळू फुले’ म्हणजे ‘बाई वाड्यावर या..’ एवढीच यांची कुवत आहे”.


आणखी वाचा – “हवं तर टोल घ्या पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ट्रॅफिकला वैतागून पोस्ट, म्हणाली, “सकाळी सात वाजता…”
दरम्यान, या रीलवर अनेक प्रेक्षकांनीसुद्धा नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. “तुम्ही निळू भाऊंची बदनामी करीत आहात, निळूभाऊंच्या समोर उभं रहायची तुमची लायकी नाही. कृपया असे करू नका”, “निळू फुले असे नव्हते. कुठं निळू फुले आणि नक्कल करणारे तुम्ही”, “प्रत्यक्षात निळू भाऊ अगदी सज्जन होते. ते अभिनय जगायचे, करायचे, दिलेली भूमिका जिवंत करायचे. त्यांची अशी नक्कल करणे शोभत नाही”. अशा प्रतिक्रियांमधून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.