‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातून प्रसिद्धीस आलेल्या लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आणि उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. मुळशी तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिभाऊ वडगावकर लिखित ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. (Prabha Shivanekar Passed Away)
‘गाढवाचं लग्न’ हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेलं प्रसिद्ध वगनाट्य आहे. या नाटकाला भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. दमदार अभिनय, अभिनयातील अचूक टायमिंग यामुळे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. १९५० ते ८०च्या दशकात तुफान लोकप्रिय असलेल्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. राज्यभरात त्यांचं हे नाटक बरंच गाजलं.
प्रभा शिवणेकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नाटकांमध्ये काम केलं. तब्बल १०० हून अधिक भूमिका साकारणाऱ्या प्रभा शिवणेकर नाटकांच्या प्रयोगानिमित्त राज्यभर फिरायच्या. ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्याचे प्रयोग तर राज्यातील अनेक खेड्यांमध्येही झाले. सोशल मीडियावर प्रभा शिवणेकर यांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांना सुद्धा अतिशय दुःख झालं असून सोशल मीडिया मार्फत ते प्रभाताईंना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
प्रभा शिवणेकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रभाताईंनी लग्न केलं नाही त्या अविवाहित होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण बबूबाई कदम आणि त्यांचा भाऊ सचिन कदम असा परिवार आहे. प्रभाताईंच्या दोन्ही भावंडांनी त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला आणि त्यांची सेवा केली.