साहित्यं, संस्कृती, कला यांसारख्या विषयांवर भरभरून बोलणारी आणि सामाजिक जाणिवा जपणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहाने केलेले नाटक, चित्रपट असो की मालिका, तिने केलेले निवेदनाचे कार्यक्रम असो की तिच्या युट्युब चॅनेलवरचे कवितावाचनासारखे उपक्रम या सर्व माध्यमातून संवाद साधताना आपल्याला जाणवत राहतं ती तिच्यातील आपुलकीची भावना. लॉकडाऊनच्या काळातही स्पृहाने सोशल मीडियासारख्या माध्यमाचा वापर करुन अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. विविध विषयांवर चर्चाही केली. छान छान कविताही वाचल्या. दर आठवड्याला ती कोणती कविता ऐकवणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनातही उत्सुकता असते. पण या आठवड्यात स्पृहाने कविता नाही तर एक छानसा सामाजिक संदेश आपल्या व्लॉगमधून दिलाय आणि हा संदेश आहे कोविडकाळात अनेकांना घरपोच भाजीपाला, धान्य, फळे पुरविणा-या नाशिकच्या अमोल गो-हे या कृषितज्ज्ञ असलेल्या शेतक-याच्या सामाजिक कार्याविषयीचा.

काय म्हणाली स्पृहा ?

आपण भाजीपाला घेताना ती दिसायला कशी हिरवीगार आहे एवढंच बघतो पण ती योग्य दर्जाची असेल का याचा क्वचितच विचार करतो. आपल्याला मिळणारा भाजीपाला कुठून आलाय ? कशा पद्धतीने पिकवलाय ? कुठे धुतलाय ? असे प्रश्न आपल्याला कधी पडतात का ? भाज्यांच्या, फळांच्या वरवरच्या रंगाला भुलून न जाता त्या आतून किती आरोग्यदायी आहेत, आपल्या आरोग्याला उपायकारक आहेत याचा आपण विचार करायला हवा. असा खात्रीशीर, आरोग्यासाठी पोषक भाजीपाला मिळण्यासाठी तिने अमोल गोऱ्हे यांच्या कार्याचा दाखला दिलाय. अमोल गोऱ्हे यांच्या ग्रिनफिल्ड एग्रो सर्विसेस कंपनीच्या मार्फत थेट शेतातून आपल्या घरात ताजा भाजीपाला, ताजी फळे पोचवण्याची सेवा देण्यात येत आहे. ऑरगॅनिक पद्धतीने पिकवला जाणारा हा भाजीपाला आणि फळे योग्य दरात या ऍपवर उपलब्ध आहे. सध्या ग्रिनफिल्ड एग्रो सर्विसेस यांची ही सेवा ठाणे आणि मुंबईमधील काही भागांमध्ये सुरू आहे. ती सेवा घेण्याचं आवाहनही स्पृहाने आपल्या चाहत्यांना केलं आहे.

 कोण आहेत अमोल गो-हे ?

कोरोना काळात जेव्हा जवळपास संपूर्ण देश थांबला होता तेव्हा अनेक कोव्हिड योद्धे न थकता, न थांबता अविरतपणे आपली सेवा पुरवित होते. नाशिकचे अमोल गो-हेही यांपैकीच एक. कोणता भाजीपाला योग्य दर्जाचा आहे ? तो भाजीपाला कशा पद्धतीने पिकवला गेलाय ? तो कसदार जमिनीत पेरला होता का? त्याच्या वाढीसाठी रासायनिक औषधांचा वापर करण्यात आला का ? या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अमोल गो-हे. गेल्या अनेक वर्षांपासून ते कृषिक्षेत्रात मोलाचं योगदान देत आहेत आणि नाशिक आणि परिसरातील शेतक-यांना मदतीचा हातही देत आहेत. अमोल गो-हेंनी कोरोना काळात मुंबई, नवी मुंबई , ठाण्यात आपल्या ग्रीनफिल्ड ऍग्रो कंपनीच्या ऍपच्या माध्यमातून ताजा, स्वच्छ भाजीपाला, फळे, धान्य, बचतगटांच्या महिलांनी बनवलेले पापड, लोणचे स्वस्त दरात घरपोच पोहचवण्याचं काम केलं. या काळात जेव्हा ठाण्यामध्ये वृत्तपत्र वाटप करणा-या मुलांच्या नोक-या गेल्या आणि त्यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली तेव्हा गो-हे यांनी त्यातील अनेकांना आपल्या या घरपोच सेवा देण्याचा उपक्रमात सहभागी करुन त्यांना रोजगार मिळवून देण्याचं कामही केलं. त्यांच्या या कामाची दखल घेत अनेक संस्थांकडून त्यांचा सत्कारही झाला. एक्सप्रेस ग्रुप सारख्या माध्यमसमुहाने त्यांच्या कार्याचा विशेष सन्मान केला तसेच दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली. अमोल गो-हेंच्या कार्याविषयी अभिनेत्री स्पृहा जोशीला माहिती मिळाली सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्याकडून. शेती आणि शेतकरी हे विषय अरविंद जगताप यांच्या किती जिव्हाळ्याचे आहेत हे त्यांच्या आजवरच्या कामातून बघायला मिळालं आहे. अरविंद जगताप यांच्याकडून ही माहिती मिळाल्यावर स्पृहाची या कामाबद्दलची उत्सुकता वाढली आणि हा भाजीपाला स्पृहानेही मागवला आणि तिला तो फार आवडला असं ती या व्हिडियोमध्ये म्हणतेय. त्यामुळेच हा व्लॉग करुन त्यांच्या कामाची माहिती पोहचवण्याचा निर्णय तिने घेतला अशी माहितीही तिने यामधून दिली. या व्लॉगला  समाजमाध्यमातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून यानिमित्ताने स्पृहाने एक चांगले पाऊल उचलले आहे अशा आशयाच्या प्रतिक्रियाही या व्लॉगखाली अनेकांनी दिल्या आहेत.